आणखी एक घोटाळा? पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातूनही मिळविले दिव्यांग प्रमाणपत्र!

0
71

दि. १६ जुलै (पीसीबी) – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातूनदेखील २०२२ मध्ये दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित प्रमाणपत्राची नोंद या रुग्णालयात करण्यात आली आहे.
पूजा खेडकर घोटाळा प्रकरणाची व्याप्ती यामुळे आणखी वाढली आहे. खेडकर यांनी केवळ अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही तर २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून तेच प्रमाणपत्र मागितल्याचे समोर आले आहे.

खेडकर यांनी यूपीएससीला सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे. त्यातील दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयातून देण्यात आले आहे. पूजा खेडकर यांना २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग आणि २०२० मध्ये मनोविकार प्रमाणपत्र देण्यात आले. या दोन्हींचे एकत्रित प्रमाणपत्र २०२१ मध्ये देण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून देखील खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आले आहे. २०२२ मध्ये हे प्रमाणपत्र दिल्याचे सांगण्यात येत आहे.

तथापि, अहमदनगर रुग्णालयाप्रमाणे औंध सिव्हिल हॉस्पिटलने तिला केवळ प्रमाणपत्रच नाकारले नाही तर अर्ज स्वीकारण्यासही नकार दिला होता. औंध सिव्हिल हॉस्पिटलचे माजी सिव्हिल सर्जन आणि आता ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अशोक नांदापूरकर यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की, “आमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज करणारे बरेच लोक आहेत, आमच्या नोंदीनुसार या महिलेने अनेक हॉस्पिटलमध्ये अर्ज केला होता. त्यामुळे आम्ही तिचा अर्ज फेटाळला. शिवाय त्यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडून यापूर्वीच असेच प्रमाणपत्र मागितले होते.’’

अशा प्रकारे प्रमाणपत्रासाठी अनेक हॉस्पिटलमध्ये अर्ज करणे कायदेशीररित्या गुन्हा आहे, यातून संशयास्पद हेतू स्प्ष्ट दिसतो, असे औंध सिव्हिल हॉस्पिटलचे विद्यमान सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी सांगितले.

वायसीएम हॉस्पिटलचे डीन डॉ. आर. वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘आम्ही पूजा खेडकर यांना ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असल्याचे दाखवले नाही. आम्ही केवळ सात टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. ’’ पूजा खेडकर यांच्या प्रकरणात झालेले गंभीर आरोप आणि रोजचे नवनवीन खुलासे पाहता, केंद्रीय मंत्रालयाने आता या घोटाळ्याची दखल घेतली असून, त्यांच्या उमेदवारीसंदर्भातील संपूर्ण वादाची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.