गुंतवणुकीवर 300 टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक

0
61

पिंपरी, दि. 14 जुलै (पीसीबी) – कॅपिटल अलायन्स मध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे 300 टक्के वाढतील असे सांगत एका व्यक्तीची आठ लाख साठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 7 डिसेंबर 2023 ते 14 जुलै 2024 या कालावधीत पिंपरी येथे घडला. याप्रकरणी 52 वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लिंडा मेहता, कुणाल सिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर आलेल्या जाहिरातीला फिर्यादी यांनी सबस्क्राईब केले. त्यानंतर आरोपींनी त्यांना एका व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केले. तुम्ही कॅपिटल अलायन्स मध्ये गुंतवणूक करा त्यामध्ये तुमचे पैसे 300 टक्के वाढतील, असे सांगण्यात आले. 10 जानेवारी 2024 रोजी कॅपिटल अलायन्सचे मालक कुणाल सिंग यांनी फिर्यादीस व्हाट्सअप वरून मेसेज करत तुम्हाला जर जास्त फायदा हवा असेल तर तुम्हाला अपर सर्किटमध्ये काम करावे लागेल. तसेच तुम्हाला इन्स्टिट्यूशन अकाउंट सुरू करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी अकाउंट सुरू केले. सुरुवातीला फिर्यादी यांनी चार लाख 10 हजार आणि नंतर चार लाख 50 हजार अशी एकूण आठ लाख 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या प्लॅटफॉर्मवर 11 लाख 18 हजार 256 रुपये जमा झाल्याचे दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे अधिक पैशांची मागणी करत त्यांची फसवणूक करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.