थर्ड आय – अविनाश चिलेकर | लोकसभेला होता तो जनतेचा कौल, विधान परिषदेला होता तो घोडेबाजार

0
414

लोकसभा निवडणुकित ४८ पैकी ३० जागा जिंकून महाआघाडी फूल फॉर्मात आली होती. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन हे एतिसाहासिक यश मिळवले. महाराष्ट्रातील जनतेने मोदींना आणि सत्ताधारी भाजपला २३ वरून थेट ९ जागांवर खाली ढकलले. आता त्याच निकालाची छाप दोन महिन्यांवर येऊन ठेपलेलेल्या विधानसभा निवडणुकिवर पडणार याचेही संकेत मिळतात. लोकसभेला जिथे महाआघाडी पुढे आहे असे जवळपास सव्वादोनशे मतदारसंघ समोर आले. परिणामी विधानसभेच्या २८८ पैकी किमान २२५ जागा जिंकण्याची शाश्वती महाआघाडीच्या नेत्यांनी द्यायला सुरूवात केली. इतकेच नाही तर शरद पवार, उध्दव ठाकरे आणि नाना पटोले यांचा आत्मविश्वास वाढला. असली आणि नकली शिवसेना कोणाची किंवा राष्ट्रवादी कोणाची हे लोकांनी लोकसभेच्या निकालातून दाखवून दिले. उद्या त्याचेच पडसाद पुढे विधानसभेला उमेटले तर आपली खैर नाही म्हणून युतीचे बहुसंख्य आमदार संभ्रमात पडले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे २३ आमदार फुटणार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार,एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील १४ आमदार पुन्हा स्वगृही म्हणजे उध्दव ठाकरेंच्या गटात जाणार, अशा बातम्यांचा रतिबही सुरू झाल्याने महायुतीत प्रचंड अस्वस्थता होती.

दरम्यान, शुक्रवारी विधान परिषद निवडणुकित १२ पैकी सर्वच्या सर्व म्हणजे नऊ जागा महायुतीने जिंकल्या. दुसरीक़डे महाआघाडी पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेस पासून पहिल्यापासून फटकून असलेल्या सहा आमदारांची मते फुटली. घोडेबाजार झाला आणि २५ कोटींना मत विकले गेले, दोन एकर जमीन दिली गेली, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनीसुध्दा एक एक आमदार पाच कोटींना विकला गेल्याचे जाहिरपणे सांगितले. पुन्हा विधीमंडळात यायची खात्री नसलेल्या आमदारांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याची चर्चा आता सुरू आहे. निकालात महायुतीचे आणि विशेषतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे प्रत्येकी दोन उमेदवार अधिकची दोन-दोन मते घेऊन जिंकल्याने जल्लोष सुरू झाला. भाजपचे पाचही उमेदवार जिंकल्याने देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. खरे तर, लोकसभा आणि विधान परिषदेतील यशापयाशाचे मोजमाप करताना नेतेमंडळी दिशाभूल करतात. लोकसभेचा निकाल हा तमाम जनतेने दिलेल्या मतांतून आलेला कौल होता. भाजपने सर्व यंत्रणा वापरून फोडलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी असली असल्याचा कितीही कांगावा केला, पण सामान्य नागरिकांनी तो स्पष्ट झिडकारला आणि फडणवीसांच्या भाजपला सणसणीत चपराक लगावली.

खरे तर, ठाकरे आणि पवार यांना लोकसभेत मिळालेल्या यशातून भाजपने धडा शिकायला पाहिजे होता, ते सगळे राहिले बाजुला. विधान परिषदेत पैशाची बोली लावून आमदारांची खरेदी-विक्री करून बाजी मारली म्हणून पुढे विधानसभेलाही महायुतीच जिंकणार अशा गमज्या मारायला लागले. भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे लोकांना मुर्ख समजतात. विधान परिषदेला सर्व जागा जिंकल्या पण त्या फुटीर आमदारांच्या मतांवर जिंकल्यात हे लोकांनाही दिसले. महायुतीचे नेते जनतेची दिशाभूल करतात आणि स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत. हातच्या काकनाला आरसा कशाला पाहिजे. आजच दै. सकाळ वाचा. सकाळ माध्यम समुहाने राज्यातील ८६ हजार लोकांचा कौल घेतला आणि तोंडावर असलेल्या विधानसभेला भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो मात्र, महाआघाडीच सत्तेत येईल, असे भविष्य वर्तविले आहे. महाराष्ट्रातील जनतेची मविआ लाच पसंती मिळेल, असे हा सर्वेक्षण अंदाज सांगतो. याचाच दुसरा अर्थ विधान परिषदेला यश मिळाले म्हणून महायुतीने हुरळून जाऊ नये.

लोकसभा निकालानंतर महिनाभराने घेतलेला सकाळ चा अंदाज सांगतोय की, राज्यातील जनतेचा कौल महाआघाडीलाच असेल. फडणवीस, शिंदे आणि दादा पवार यांनी यातून शिकले पाहिजे. वेळ गेलेली नाही अन्यथा मोदींच्या १८ नाही अगदी ३६ सभा राज्यात झाल्या तरी महायुती सत्तेत येणार नाही हे लक्षात ठेवा. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मूळ प्रश्नांवर भाजप दहा वर्षांत अपयशी ठरली आहे, असे लोकमांचे मत आहे. भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडालेलेच भाजपच्या वॉशिंगमशिनमध्ये पवित्र होतात हे लोकांना दिसते. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून मराठी अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न भाजपने केल्याने मराठी माणूस दुखावला आणि त्यानी दोन गुजराथ्यांना मराठी बाणा दाखवून दिला. त्यानंतरही पुन्हा पुन्हा भाजप तसेच वागणार असेल तर प्रभू श्री राम काय ब्रम्हदेव आला वाचविणार नाही. उद्या विधानसभेलाही असाच कडेलोट होईल हे ठिक. पराभवाच्या भितीपोटी तीन वर्षांपासून विविध कारणे सांगत रोखून धरलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुका झाल्या तर गाव पातळीवर भाजपचे पानीपत होईल, हे लक्षात घ्या.