मुंबई, दि. १३ जुलै (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत अवघ्या १७ जागांवर यश मिळाल्यानंतर महायुतीत चिंतेचं वातावरण होतं. महाविकास आघाडीनं तब्बल ३० जागा जिंकत सुसाट कामगिरी केली. पण विधान परिषदेत मविआला धक्का देत महायुतीचे सगळेच्या सगळे ९ उमेदवार विजयी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. ठाकरे सेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या पाठिंब्यावर जयंत पाटील निवडणूक लढवत असताना, या दोन्ही उमेदवारांचे अनेक पक्षांमध्ये उत्तम संबंध असताना महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले.
महायुती मधील कोणत्याही उमेदवाराचा पराभव झाला असता, तर विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला असता. त्यामुळे तिन्ही पक्षांनी मतांचं योग्य नियोजन करत ९ उमेदवार निवडून आले. मिलिंद नार्वेकरांचे एकनाथ शिंदेंशी उत्तम संबंध आहेत. जवळपास सगळ्याच पक्षांमधील नेत्यांशी नार्वेकरांचे सलोख्याचे संबंध असल्यानंच ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली. नार्वेकर रिंगणात असल्यानं शिंदेसेनेचे आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता होती. पण क्रॉस व्होटिंग टाळत शिंदेंनी महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणले.
भाजपच्या पहिल्या चारही उमेदवारांना प्रत्येकी २६ मतं मिळाली. विजयासाठी २३ चा कोटा होता. त्यामुळे भाजपच्या चार उमेदवारांना १२ अतिरिक्त मतं मिळाली. तर पाचवे उमेदवार सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची १४ मतं मिळाली. भाजपच्या ४ उमेदवारांची अतिरिक्त मतं खोत यांना दुसऱ्या फेरीत ट्रान्सफर झाली. १२ मतं मिळाल्यानं खोत यांना मिळालेली मतं २६ पर्यंत पोहोचली. ते विजयी झाले. तर नार्वेकरांना पहिल्या फेरीत २२ मतं मिळाली. त्यांना दुसऱ्या फेरीत एकाच मताची गरज होती. त्यामुळे ते सहज निवडून आले.