अमित गोरखेंमुळे पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला, भाजपची ताकद वाढली

0
142

महाराष्ट्र दि. १२ जुलै (पीसीबी)- भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अमित गोरखे अखेर आमदार झाले. आजच्या विधान परिषद निवडणुकितून पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला. नाराजीचा सूर असला तरी आगामी महापालिका निवडणुकिसाठी शहर भाजपला अधिकची ताकद मिळाली. दोन वर्षांपूर्वी निष्ठावंत गटातून ओबीसी महिला म्हणून उमाताई खापरेंना भाजपने आमदार केले आता त्यांच्या जोडिला अमित गोरखे आले. भाजपने २०१४ पासून अजितदादांचा हा बालेकिल्ला खिळखीळा करायला सुरवात केली. सुरवातीला फक्त आमदार लक्ष्मण जगताप भाजपकडे होते, नंतर भोसरीकर महेश लांडगे येऊन मिळाले. राष्ट्रवादीच्या गोटातील तब्बल ४० नगरसवेकांना भाजपची उमेदवारी देऊन २०१७ मध्ये महापालिका ताब्यात घेतली. महापालिका तसेच राज्यात आणि केंद्रातही सरकार असल्याने सत्तेतून सत्ता मिळाली गेली आणि शहरात भाजपची पाळेमूळे खोलवर रुजली. याच सत्तेची फळे निष्ठावंतांना मिळाली. गोपीनाथ मुंडे यांची निवडणूक यंत्रणा सांभाळणारे अमर साबळे यांना अनुसुचित प्रवर्गातील असल्याने थेट राज्यसभेवर संधी मिळाली. निष्ठावंत गटातील गोपीनाथ मुंडे यांचे उजवे हात समजले जाणाऱ्या सदाशिव खाडे यांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकऱणाचे अध्यक्षपद मिळाले. चिंचवडचे जेष्ठ वकिल सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. आता आमदार झालेल्या सर्वात तरुण अशा अमित गोरखे यांच्याकडे थेट अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. खऱ्या अर्थाने भाजपने पिंपरी चिंचवड शहराला न्याय दिला.

शहराला खरा न्याय भाजपनेच दिला…
पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीला ५० वर्षे झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इथे ४० वर्षे राज्य केले, पण एकाही कार्यकर्त्याला कधी विधानपरिषद किंवा राज्यसभा वाट्याला आली नाही. भाजपने मात्र ती कसर भरून काढली. शिरूर, मावळ असे दोन लोकसभा खासदार शहराला होते, पण साबळेंच्या निमित्ताने तिसरा खासदार दिला होता. श्रीमती खापरेंमुळे विधान परिषद शहरात आली. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेली तीन-तीन पदे शहरात आली. आता अमित गोरखेंना परिषदेवर संधी देऊन फक्त भाजपचेच चार आमदार शहरात झाले. आगामी विधासभा आणि महापालिका निवडणुकित त्याचा फायदा होईल.

कुठलाही राजकीय वारसा नाही, एकनिष्ठेचं फळ

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अमित गोरखे यांचे वलय आहे. त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोरखे यांचे पिताश्री एका कंपनीत सुरक्षारक्षक होते. आई शिक्षिका आहेत. अत्यंत कष्टातून अक्षरशः सायकलवर पेरू आणि वर्तमानपत्र विकून प्रपंचाला हातभार लावण्याचे काम केले. काळभोरनगर येथील चाळीत राहणारे गोरखे हे तसे राष्ट्रतेज मित्र मंडळाचे कार्यकर्ते. गणेशोत्सवात जीवंत देखावे सादरिकरणाची प्रथा त्यांनी सुरू केली आणि शेकडो मुलांना कला क्षेत्रात आणले. कलारंग या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नामवंत कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविले. हे सुरू असताना त्यांनी नोव्हेल शिक्षण संस्था स्थापन करून ती नावारुपाला आणली. दहा वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश केला आणि सुरुवातीपासूनच भाजपशी एकनिष्ठ राहिल्याने गोरखे यांना न्याय मिळाला. देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व म्हणून समाज संघटन देखील त्यांनी केले. याशिवाय, अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी त्यांचा भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित देखील त्यांना करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची लहानपणापासूनच नाळ जोडलेले आहे.

एक न्यूज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पदासाठीचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. सध्या त्यांच्यावर भाजपकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशा जबाबदाऱ्या आहेत. अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पिंपरी चिंचवड भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय भाजपकडून कोणत्याही गटातटाच्या राजकारणात न पडता अमित गोरखे यांना उमेदवारी दिल्याने येणाऱ्या विधानसभेची गणिते बसवणे भाजपला सोपे जाणार आहे.