तळेगाव, दि. 11 (पीसीबी) – तळेगाव दाभाडे शहरातील निलय सोसायटी समोर भरधाव वेगात आलेल्या एका कारने सात वर्षीय चिमुरड्याला उडवले. सोसायटीच्या गेटच्या बाहेर गेलेला बॉल घेऊन येत असताना हा चिमुरडा कारखाली सापडला. ही घटना मंगळवारी (दि. 9) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
अनिल शिवाजी जाधव (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप विठ्ठलराव देवकर (रा. मंगरूळ, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांचा मुलगा सोसायटीच्या आवारात मुलांसोबत खेळत होता. त्यांचा बॉल सोसायटीच्या गेटच्या बाहेर रस्त्यावर गेला. त्यामुळे तो बॉल आणण्यासाठी गेटच्या बाहेर गेला. बॉल घेऊन येत असताना देवकर याने त्याच्या ताब्यातील कार (एमएच 04/एचडी 0569) भरधाव चालवून मुलाला धडक दिली. त्यामध्ये मुलाच्या पायावर कारचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर देवकर मुलाला रुग्णालयात घेऊन न जाता निघून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.