बच्चू कडू यांची आता तिसरी आघाडी

0
90

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) मुंबई, दि. ११ – विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे आणि स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच पुन्हा व्यापक बैठक घेऊन या आघाडीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी हवा तापत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. जागावाटपाच्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे अंदाजपत्रकात अनेक लोकप्रिय घोषणा करून विधानसभेला यश मिळवण्यासाठी महायुतीने जोरदार मार्केटिंग सुरू केले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे, प्रहार संघटनेचे आमदार कडू आणि स्वाभिमानी संघटनेचे तुपकर यांच्यात पुण्यात बैठक झाली. या बैठकीत तिसरी आघाडी स्थापन करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. आमदार कडू यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देताना असा प्रयत्न सुरू असल्याची कबुली देतानाच विधानसभेला ठरावीक जागा या तिसऱ्या आघाडीच्या वतीने लढविण्यात येणार असल्याचेही सांगितले. तुपकर यांनीही याला दुजोरा दिला आहे.

या तीन संघटनेबरोबरच आणखी काही छोट्या संघटनांना या आघाडीत सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच दुसरी बैठक बोलावण्यात येणार असून, त्यामध्ये अनेकांना निमंत्रण देण्यात येणार आहे. महायुती आणि महाआघाडीमध्ये अनेक छोटे पक्ष आहेत; पण त्यांना महत्त्व मिळत नसल्यामुळे ते नाराज आहेत. अशावेळी त्यातील नाराज पक्षांना आपल्या सोबत घेण्याचा तिसऱ्या आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न असल्याचे समजते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकसभा स्वतंत्रपणे लढवली. त्यांना यश आले नाही; पण यापूर्वी त्यांनी तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. आता नव्याने ते या प्रयत्नात सहभागी होण्याची शक्यता आहे.