“चंदू चॅम्पियन” हा चित्रपट करमुक्त करा- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांची मागणी पिंपरी चिंचवड कलाप्रेमी मंच यांनी घेतलेला सुंदर कार्यक्रम.

0
69

दि २ जुलै (पीसीबी ) – पिंपरी चिंचवड शहराचे भूषण असलेल्या पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे प्रेरणादायी कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने “चंदू चॅम्पियन” हा चित्रपट करमुक्त करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी आज येथे केली.
पिंपरी चिंचवड कलाप्रेमी मंच आणि स्वराज ग्रुपच्या वतीने पॅरा ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा भव्य सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. येथील सायन्स पार्कच्या प्रेक्षागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पिंपरी महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे, मातोश्री संस्थेचे हेमंत खंडागळे, पद्मयानी ट्रस्टचे विष्णू मांजरे, मुख्य संयोजक विजय जगताप व विजय अण्णा चौधरी आदी उपस्थित होते.
शहराचा अभिमान असलेल्या श्री पेटकर यांचा यावेळी स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र देऊन यावेळी मान्यवरांनी गौरव केला. आपल्या भाषणात मानव कांबळे यांनी, अपंगांना ऊर्जा देण्याचे काम पेटकर यांनी केले तर आहेच मात्र जे धडधाकट आहेत अशा सर्वांना प्रेरणा व साहसरूपी बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. या शहरात १९८२ पासून त्यांचे वास्तव्य असून वास्तविक पिंपरी महापालिकेने शहरातील सर्व विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ही एका अपंगाची कहाणी नसून प्रतिकूल काळ व परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ऑलिम्पिक विजेता व्हायचंच हा जिद्दीचा प्रवास म्हणजे पेटकर सरांनी रचलेले कार्य आहे, अशी भावना शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केली.
विजय जगताप यांनी पेटकर यांचे चरित्र मराठीतून पुस्तकरूपाने पुढे आणणार असल्याचे आपल्या प्रास्ताविकात म्हटले.
गौरव चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर उल्हास मापुस्कर यांनी आभार मानले. सत्कार सोहळ्यानंतर मुलाखतकार विजय बोत्रे पाटील यांनी पेटकर यांची प्रकट मुलाखत घेतली.