भारतीय न्याय संहिता अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात पहिला गुन्हा दाखल

0
106

आधी कलम नंतर आरोपी अशी पोलिसांची अवस्था

हिंजवडी, दि. २

१ जुलै 2024 पासून देशभरात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. भारतीय दंड संहिता 1860, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1898 आणि भारतीय साक्ष अधिनियम 1872 या तीन कायद्यांमध्ये बदल करून नव्याने तीन कायदे बनवण्यात आले आहेत. पोलिसांना आजपासून नवीन कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी सोमवारी (दि. 1) सकाळी दहा वाजता पहिला गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी गंगाराम प्रल्हाद चव्हाण (वय 29, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गंगाराम चव्हाण हे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन कामानिमित्त पुनावळे येथे जाण्यासाठी मुंबईहून भूमकर चौकात आले. सोमवारी पहाटे तीन वाजता भूमकर चौकात गाडीतील सामान उतरवून ते रस्त्याच्या बाजूला थांबले असताना एक टेम्पो (एमएच 20/ईएल 8792) भरधाव वेगात आला. त्या टेम्पोचे चाक घासून गेल्याने चव्हाण यांच्या सहा वर्षीय मुलीच्या पायाला दुखापत झाली.

दरम्यान, हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चव्हाण यांना थेरगाव रुग्णालयात पाठवले. त्यानंतर याप्रकरणी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (बी) तसेच मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

भारतीय न्याय संहिता कलम 281

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 279 नुसार सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे अपराध होते. यात सहा महिन्यांचा कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद होती. हा गुन्हा दखलपात्र व जामीनपात्र होता. भारतीय न्याय संहितेत याचा केवळ कलम क्रमांक बदलण्यात आला आहे. शिक्षेची तरतूद पूर्वीसारखीच आहे. भारतीय न्याय संहितेत या अपराधासाठी कलम 281 आहे.

भारतीय न्याय संहिता कलम 125 (ब)

भारतीय न्याय संहितेचे कलम 125 (ब) इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती करण्याबाबत आहे. याअंतर्गत तीन वर्षे कारावास किंवा दहा हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि जामीनपात्र आहे.

नव्या कायद्यात कलमांचा घ्यावा लागणार शोध

भारतीय दंड संहिता 1860 याचे नाव बदलून भारतीय न्याय संहिता 2023 करण्यात आले आहे. भारतीय दंड संहिता मध्ये 511 कलमे होते. तर भारतीय न्याय संहितेत 356 कलमे आहेत. 175 कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. नव्या कायद्यात आठ नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करताना नव्या कायद्यात संबंधित गुन्ह्याचे कलम अगोदर शोधावे लागणार आहे.

रद्द झालेल्या कलमांचीही ठेवावी लागणार माहिती

भारतीय दंड संहितेचे रुपांतर भारतीय न्याय संहितेत करताना 22 कलमे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे कोणती कलमे रद्द झाली आहेत, त्याबाबत देखील पोलिसांना अपडेट राहावे लागणार आहे. रद्द झालेल्या कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली होती. त्यामुळे गुन्हा दाखल करताना अगोदर पोलिसांना कलमांचा शोध घ्यावा लागेल त्यानंतर आरोपींचा शोध घ्यावा लागणार आहे.