राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

0
178

पुणे : राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होती. अशातच आता राज्यभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आजच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

वरिष्ठ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यसभा उमेदवाराची घोषणा आज करण्यात येणार आहे. आजच संबंधित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत होती. अखेर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. घराणेशाहीचा आरोप स्वीकारुन, अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून, अजितदादांनी घरातलाच उमेदवार दिला आहे, आता अजित पवारांची ही खेळी कितपत योग्य ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रफुल्ल पटेलांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर अजितदादा कुणाला पाठवणार? हा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. राज्यसभेसाठी अजित पवार घरातला चेहरा देणार की, पक्षातील ज्येष्ठ नेत्याची त्यावर वर्णी लागणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर हा सस्पेन्स संपल्याचं दिसतंय. राज्यसभेसाठी अजितदादांकडून सुनेत्रा पवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान बारामतीच्या प्रतिष्ठेच्या लढतीत सुप्रिया सुळेंकडून पराभूत झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी पुणे आणि काटेवाडीच्या समर्थकांनी केली होती. दरम्यान, राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ पवार, छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी आणि आनंद परांजपे यांची देखील नाव चर्चेत होती.