कारस्थानी देवाभाऊ कुठले चाणक्य ! ढेकळे घ्या… शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कटकरस्थानाचा पुरता पंचनामा केलाय… त्यासाठी सर्व उदाहरणासह विस्ताराने एक पत्र लिहिले आहे. अंधारे यांच्याच भाषेत ते आहे त्या शब्दात देत आहोत…

0
149

प्रिय देवा भाऊ

विधिमंडळ गटाच्या बैठकीत आपण मांडलेले विचार फार काळजीपूर्वक ऐकले पुन्हा पुन्हा ऐकले. आपल्या पक्षाचे लोक जसे आपल्याला चाणक्य वगैरे म्हणतात तसे चाणक्य म्हणून आपण काही नवे संशोधन केले आहे का म्हणून फार उत्सुकतेने ते ऐकले. मात्र त्याच्यात कुठलाच नवा मुद्दा नव्हता.

पॉलिटिकल अर्थमॅटिक असा शब्द 30-40 वेळा वापरला म्हणजे आपल्याला खरंच अर्थमॅटिक कळलंय असं वाटत असेल तर आपल्याला सांगितलं पाहिजे की आपल्याला ढेकळं काही कळलेलं नाही.

आपली अवस्था म्हणजे “गिरे तो भी नाक ऊपर” अशी झाली आहे.

मार्गदर्शन करताना आपण असे म्हणालात की मी पळणारा माणूस नाहीये मी लढणारा माणूस आहे. यावर दोन दिवसापूर्वीच मी म्हटलं होतं की जो माणूस अतिरेकी सत्ताकांक्षासाठी एवढे पक्ष फोडू शकतो आणि एवढा महाराष्ट्राच राजकारण नीचतन पातळीला नेऊ शकतो. तो इतक्या सहजासहजी आपली इच्छाशक्ती सोडणार नाही. तुम्ही पळून जाणारे नाही तर दुसऱ्यांचे निवडून आलेले आईचे आमदार खासदार पळवून नेणारे आहात.

          "मला मोकळं करा" हे आपलं स्टेटमेंट निव्वळ आणि निव्वळ केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणणारे होतं हे न करण्या इतकं इथे कोणी दुधखुळे नाही. आपण ज्या पद्धतीने सांगितले की अमित भाई शहा यांच्याशी मी काही statistic बोललो आहे ते सुद्धा आम्ही समजू शकतो.

   निवडणुकीच्या काळापुरता स्वतःचा चेहरा बाजूला ठेवून पुन्हा ऐन वेळेला स्वतःची प्राणप्रतिष्ठा करण्यासंबंधीच तुम्ही स्टॅटिस्टिक मांडला असेल.  कारण तुम्ही नक्कीच इतक्या मोठ्या मनाचे नाही आहात की ;  तुमच्या सोबत असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे किंवा सुधीर मुनगुंटीवार या लोकांना ती संधी सहजासहजी द्याल. 

आपण असे म्हणाला की तीन पक्ष नाही तर चार पक्षांसोबत लढत होतो आणि चौथा पक्ष म्हणजे कथानक होतं. देवेंद्रजी तुमच्या खोटं बोलण्याच्या कलेच मला अपार कौतुक वाटतं.
भारतीय राज्यघटनेमध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत आणि अहस्तक्षेपाचे तत्व स्वीकारले आहे असे असताना सुद्धा मोदीजी सरळ सरळ ‘वन नेशन वन इलेक्शन’ ची भाषा करतात हे संविधानाच्या कोणत्या तत्त्वात बसते ते मला सांगा. कारण भारतीय संविधानाने अध्यक्षीय लोकशाही नाही तर संसदीय लोकशाही स्वीकारली आहे हे आपल्याला ज्ञात असेलच.

संविधानाच्या उद्देशिकेतच हे संविधान सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष असेल असे स्पष्टपणे म्हटले आहे आणि 42 व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द सुद्धा अंतर्भूत केलेला आहे असे असताना सुद्धा इतर धर्मीयांचा द्वेष करणे किंवा इतर धर्मियांना जाणीवपूर्वक कमी लेखणे हे संविधानाच्या कोणत्या कलमात येते हे देवेंद्रजी जरा आम्हाला समजावून सांगा.

धर्म नावाची बाब ही वैयक्तिक असली पाहिजे तुमचा धर्म तुमच्या उंबरठ्याच्या आत ठेवला पाहिजे सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे असे स्पष्टपणे संविधानाने नमूद केलेले असतानाही या देशाच्या शिक्षण प्रणालीमध्ये मनुस्मृतीचे धडे आणण्याचा प्रयत्न करणे हे संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये सांगितले आहे हेही एकदा स्पष्ट करा.

वर्ग-१चे राजपत्रित अधिकारी हे संघ लोकसेवा आयोगामार्फत भरले जावेत असे संविधानिक तरतुदीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असताना सुद्धा त्यांची भरती ही वेगळ्या पद्धतीने थेटपणे व्हावी हे संविधानाच्या विपरीत वागणे देवेंद्रजी तुम्हाला मान्य आहे का ?
असो मी असे अनेक मुद्दे सांगू शकते परंतु आता जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ.

आपण जेव्हा म्हणालात एका विशिष्ट समाजाच्या मतांवर उद्धव ठाकरेंच्या जागा निवडून आल्या त्या वेळेला बैठकीतले लोक ‘शेम-शेम’ असा उच्चार करत होते. त्यांचा हा उच्चारच किती दिवस आणि किती द्वेष पूर्ण आहे हे अधोरेखित करणारा आहे. ज्या विशिष्ट समाजाबद्दल शेम शेम असा तुम्ही उल्लेख केला तो समाज तुम्हाला इतका का असतो काय ते तुमच्यासारखी नळपट्टी पाणीपट्टी घरपट्टी संपत्तीचा कर पथकर नाके, वाहतुकीचे नियम, शाळा प्रवेश किंवा नोकरी साठी अर्ज करतानाचे नियम तुमच्यासारखे फॉलो करत नाहीत का?
इथल्या दलित आणि मुस्लिमांची मतं तुम्ही खुशाल इन्केश कराल परंतु त्या मतांच्या मोबदल्यात त्यांना प्रतिनिधित्व मात्र देणार नाही आणि या उपर या समूहांनी जर वेगळा निर्णय घेतला तर तुम्ही त्यांना अत्यंत गलिच्छ आणि द्वेषपूर्ण शब्द वापरणार?
इथल्या दलित मुस्लिमांची मतं म्हणजे काय तुम्हाला मोदीजींच्या फिक्स डिपॉझिट मधील अनामत वाटते काय?

तुमच्या या मांडणीमध्येच तुमचा विचार किती तुकडे तुकडे गॅंगला पूरक आहे ते सांगणारा आहे.

देवेंद्रजी, आपण असं म्हणालात की आमच्याकडे खूप सारे उद्योग आलेले आहेत. कोणते उद्योग आलेले आहेत ?आणि त्याचे जे काही करारनामे आहेत ते लगेचच पुराव्यांशी तुम्ही त्या बैठकीमध्ये का बरं दाखवले नाहीत आणि त्या उद्योगांची नावे सुद्धा तुम्ही का सांगितली नाहीत.

बुलढाणा किंवा संभाजीनगरच्या जागेचा संदर्भ देत आपण फार मोठे तीर मारलेत या आविर्भावात तुम्ही बोलत होतात. परंतु तुम्हाला सांगितले पाहिजे की या दोन्ही जागा मत विभाजनाच्या फटक्यामुळे गेल्या आहेत. तर अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला असं आम्ही अजिबातच मानत नाही.
कोकणात आम्हाला नक्कीच अनपेक्षित पणे झटका बसला पण त्याची कारण तुमच्या कपटकारस्थानाच्या राजकारणात आहेत. तुम्ही आणि तुमच्या पक्षाने जे अत्यंत पाताळयंत्री षड्यंत्राचे राजकारण करून कपटनीतीने स्वायत्त संस्था हाताशी धरून आमचं चिन्ह चोरलं. त्यामुळे नवीन चिन्ह आम्हाला रुजवायला वेळ लागला. लोकांच्या मनामनात उद्धव ठाकरे हे नाव तर होतं मात्र वर्षानुवर्षे जे निवडणूक चिन्ह त्यांच्या मनावर बिंबवलं होतं ते चिन्ह निघू शकलं नाही. देवेंद्रजी निवडणूक चिन्हांच्या बाबत तुम्ही स्वायत्त यंत्रणांचा कसा गैरवापर केला आणि कपटकारस्थान केले हे माढा बीड सातारा या पिपाणी या चिन्हाला मिळालेल्या मतसंखेवरून कळू शकेल. कारण तुम्ही सरळ सरळ आमच्याशी लढत देऊच शकत नाही आमच्याशी लढण्यासाठी तुम्हाला वारंवार अशा पद्धतीची कपटकारस्थाना आणि स्वायत्त यंत्रणांचा आधार घ्यावा लागतो.

देवेंद्रजी तुम्ही अर्थ मॅटिक अर्थमॅटीक असाउदघोष करत होता. तुम्हाला जर पराभवाचा अन्वयार्थ कळला असता, _ तुम्हाला जर अर्थ मॅटिक कळलं असतं तर या राज्यामध्ये लोकांच्या मनामध्ये कांदा कापूस सोयाबीन या पिकांच्या आधारभूत किमतीच्या बाबत तुम्ही घेतलेलं धोरण किंवा त्याच्या आयात निर्यातीच्या संबंधाने राबवलेलं धोरण याचा जरा कानोसा तुम्ही घेतला असता.
_ तुम्हाला जर अर्थमॅटिक कळलं असतं तर वर्धा मध्ये रामदास तडस यांच्या सुनबाईने घेतलेली पत्रकार परिषद किंवा राहुल शेवाळे वर रिंकी बक्सलाने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप, प्रज्वल रेवणाची उमेदवारी मणिपूरमध्ये निर्वस्त्र केलेल्या मायमाऊल्या, सुधीर मुनगुंटीवारांचे अत्यंत गलिच्छ वक्तव्य , खेळाडू महिलांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच दिलेली उमेदवारी याचाही तुम्ही विचार केला असता.
तुम्हाला जर अर्थ मॅटिक कळले असते तर बारसो रिफायनरीच्या आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला, देहू आळंदीच्या वारकऱ्यांवर झालेला लाठी हल्ला , अंतर्वली सराटीतल्या आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला आणि त्या हल्ल्यानंतर आंदोलकांची चौकशी करण्यासाठी नेमलेली एसआयटी यावर तुम्ही चिंतन केलं असतं.
एकीकडे मोदींची गॅरंटी म्हणत असतानाच आधी शिंदेंना आपल्या बाजूने केलं मग अजितदादांचे लोक स्वतः सोबत घेतले यानेही तुम्हाला गॅरंटी मिळत नव्हती तेव्हा तुम्ही अशोकराव चव्हाण यांना ब्लॅकमेल केलं. या तुमच्या चुका तुम्ही त्या बैठकीत का सांगितल्या नाही.
तुम्हाला जर अर्थ मॅटिक कळलं असतं तर नोकर भरती वरचे बँन , सातत्याने लीक होणारे पेपर , अंगणवाडी आशावर्कर किंवा नोकरदारांचे प्रश्न पेन्शन धारकांचे प्रश्न याबद्दल तुम्ही चिंतन केलं असतं.
तुमच्या पक्षातल्या कुणी तुमचं काम केलं किंवा नाही केलं याची फार मोठी आकडेवारी माझ्याकडे आहे. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना पाडण्यासाठी कोण सक्रिय होत? लातूरच्या उमेदवाराचं काम भाजपच्या कोणत्या आमदाराने केलं नाही? नगरमध्ये सुजय विखेंचा पराभव हवा असं कुणाला वाटत होतं? अंबाजोगाई केज मध्ये तुमचाच आमदार असताना तिथून पंकजांना लीड का मिळाली नाही? अशी फार मोठी जंत्री माझ्याकडे आहे.
मात्र तुमच्यासारखं स्वतःचं ताट सोडून इतरांच्या ताटात डोकावण्याची माझी अजिबात इच्छा नाही.

देवेंद्रजी एक नेता म्हणून आपल्या हरलेल्या सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुन्हा एकदा लढण्याचे बळ देण्यासाठी नक्कीच ऊर्जा दिली पाहिजे पण ती ऊर्जा देताना पुलिटिकल अर्थ मॅटिक नेमकं काय असतं कसं असतं हे सुद्धा समजावून घेतलं पाहिजे.

बीड मधली जागा पराजित व्हायला कारण तुम्ही आणि तुमचा पक्ष आहे हे कृपया समजून घ्या.
आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना निवडून आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले होते मात्र मोदीजींनी अंबाजोगाईच्या सभेत प्रचाराचे भाषण केलं ते भाषण जाणीवपूर्वक मराठा ओबीसी असं ध्रुवीकरण करणारं होतं ज्याचा फटका पंकजा मुंडे ला बसला.( त्यात मतदारसंघात त्यांचा कसलाही संपर्क मागच्या काळात नव्हता हेही महत्त्वाचे) अर्थात ती तुमच्या मनासारखी खेळी यशस्वी झाली हे कधीतरी मान्य करा.

ज्या नाशिक आणि हेमंत गोडसे बद्दल आपण बोलत आहात तिथे आपल्याला कळायला हवं की राजाभाऊ वाजे हे प्रत्येक फेरीमध्ये आघाडीवर होते एकही फेरी ते पिछाडीवर नव्हते.

ज्या वाशिम यवतमाळ आणि हिंगोली बद्दल तुम्ही बोलत आहात तिथे तुम्ही शिंदे गटाचा सर्वे च्या नावाखाली घात काढला आणि त्यांचे उमेदवार बदलायला तुम्ही भाग पाडले.
नाशिकला सुद्धा हेमंत गोडसे यांच्या ऐवजी जर छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी असती तर… परंतु तुम्हाला इतरांना आपल्या ताटाखालचं मांजर करून ठेवण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे पण देवेंद्रजी जो इतरांच्यासाठी खड्डा होतो तो स्वतःच त्या खड्ड्यांमध्ये पडतो.

विधानसभांच्या निवडणुकांच्या साठी तुम्ही नक्की सज्ज व्हावे. आम्ही तुमच्यासारखे कपटकारस्थान करणारे नाहीत त्यामुळे अत्यंत सोहर्दाच्या वातावरणात आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो मात्र अपेक्षा असेल की किमान विधानसभेला तरी या राज्यातले आणि या देशातले प्रश्न तुम्हाला कळायला हवेत.

असो तुमच्या प्रत्येक षडयंत्राला खालून पाडण्यासाठी आणि सत्य लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत.
तुमच्याकडे स्वायत्त यंत्रणा शिकार पैसा आणि इडीच्या धाडसत्रांचा धाक असेल. आमच्याकडे लोकाभिमुख प्रश्न आणि त्यांची सोडवणूक करण्याचा कृती कार्यक्रम आहे.

माझ्याकडून स्नेह आहेच वृद्धीगंत व्हावा की नाही याची जबाबदारी सर्वथा आपली आहे.

आपली बहीण
सुषमा अंधारे