मावळ लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ

0
169

मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी उद्या ४ जून रोजी संपन्न होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर, मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारूण आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक यांचा समावेश होता.

बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, सुनील पांढरे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी राजू ठाणगे, निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी प्रमोद ओंभासे, मतमोजणी निरीक्षकांचे संपर्क अधिकारी सचिन चाटे, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी आनंद कटके, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप तसेच मावळ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, अर्चना यादव, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम आदी उपस्थित होते.

मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी असे एकूण १ हजार ५३० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. मतमोजणी केंद्रातील व्यवस्थेबाबत माहिती देताना सिंगला म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. याकरिता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टींग हॉलमध्ये मतमोजणीसाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र ५ मतमोजणी टेबल असणार आहेत. तर पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात आले असून एकूण ११३ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे.

विधानसभानिहाय मतमोजणी टेबलची रचना
पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी २४ टेबल लावण्यात आले असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून मतमोजणीच्या २५ फेऱ्या होतील. उरण विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून मतमोजणीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल लावण्यात आले असून २५ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २४ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून २३ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी १६ मतमोजणी टेबल लावण्यात आले असून २५ मतमोजणी फेऱ्या होतील.

विभागीय आयुक्तांची मतमोजणी केंद्रास भेट
आपसात समन्वय ठेऊन मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडा – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज मावळ लोकसभा मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मतमोजणी केंद्रातील केलेल्या तयारीची तसेच व्यवस्थेबद्दलची सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उप आयुक्त वर्षा उंटवाल, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, सुनील पांढरे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिले.