वर्ष 2004 ते 2019 या कालावधीत लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुका या मे महिन्यातच संपल्या. मे मध्येच निवडणुकीचे निकाल समोर आले. पण 2024 मधील निकाल थोडा वेगळा ठरला. निवडणुकीच्या इतिहासातील ही सर्वात दीर्घ निवडणूक ठरली आहे. संपूर्ण मे महिना संपून 1 जून रोजी सुद्धा सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान झाले. 4 जून रोजी लोकसभेचा निकाल हाती येतील. याच दरम्यान एक मोठी घटना घडली. गेल्या 20 वर्षांत असे काही घडले नव्हते. परदेशी पाहुण्यांचं असं वागणं बाजाराला काही रुचलं नाही.
तर लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतारचे सत्र दिसले. मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची जमापुंजी घेऊन गाशा गुंडाळला. यापूर्वी परदेशी पाहुण्यांनी 2004 मध्ये असा कारनामा केला होता. तेव्हापासून या 20 वर्षांत परदेशी गुंतवणूकदार असे विपरीत वागले नव्हते.
परदेशी गुंतवणूकदारांनी थोडीफार नाही तर 25,500 कोटींहून अधिक रक्कम शेअर बाजारातून काढून घेतली आहे. हा आकडा लहान नाही. गेल्या 20 वर्षांतील आकडेवारी मागे वळून पाहता, असे पहिल्यांदाच घडले. एक्झिट पोल पाहता, बाजाराला पण परदेशी पाहुण्यांच्या या पलायनाचे कोडे अंचबित करणारे आहे. लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीला परदेशी पाहुण्यांनी ठेंगा दाखवला. परदेशातील पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी, FPI ने मे महिन्यात बाजारात गुंतवलेले 25,500 कोटींहून काढून घेतले. यापूर्वी एप्रिल महिन्यात त्यांनी 8,700 कोटी रुपये काढले होते. त्यावेळी मॉरीशसचा वाद होता. इतर कारणं होती. पण मे महिन्यात काढलेली रक्कम भलीमोठी आहे.
डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, यापूर्वी परदेशी पाहुण्यांनी मार्च महिन्यात 35,098 कोटी रुपये, फेब्रुवारी महिन्यात 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर जानेवारी महिन्यात शेअर्समध्ये 25,743 कोटी रुपये काढले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागेल. त्यानंतरच परदेशी पाहुणे त्यांचा गुंतवणुकीचा विचार पक्का करतील, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे.
लोकसभेच्या निकालापूर्वी मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढली, तो आकडा या 20 वर्षांतील सर्वात जास्त आहे. 2004 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 3248 रुपये काढले होते. 2009 मध्ये परदेशी पाहुण्यांनी मे महिन्यात 20,116 कोटी रुपये ओतले होते. 2014 मध्ये पहिल्यांदा मोदी सरकार आले. त्यावेळच्या मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात 14,007 कोटी गुंतवले होते. तर वर्ष 2019 मधील मे महिन्यात गुंतवणुकीचा आकडा 7920 कोटींच्या घरात होता.