-कर्मचाऱ्यांच्या कष्टामुळेच महापालिकेचा करसंकलनामध्ये विक्रम!!
-आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करसंकलनामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षामध्ये पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामधील करसंकलनामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विभागातील २३ कर्मचाऱ्यांचा पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक ३१ मे रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह चिंचवड येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्वांना प्रशस्तीपत्र आणि इकिगाई या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. यावेळी करसंकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख, प्रशासन अधिकारी नाना मोरे, राजाराम सरगर, चंद्रकांत विरणक, शीतल वाकडे आदी उपस्थित होते. यावेळी करसंकलन विभागाने करसंकलनासाठी घेतलेला पुढाकार व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
करसंकलन विभागाने गतवर्षी माहिती विश्लेषण, रील स्पर्धा, सोशल मीडियातून जनजागृती आदी उपक्रम राबवून महापालिकेच्या ४२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ९७७ कोटींचा विक्रम केला. यामध्ये योगदान देणाऱ्या ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’, ‘टेक नाईन’, ‘स्थापत्य कन्सल्टंट ‘ यांनासुद्धा गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, “करसंकलन विभागाने मागील वर्षी करसंकलन करण्यासाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. नागरिकांपर्यंत मालमत्ताकरावरील सवलत पोहोचविण्यासाठी विशेष एसएमएसच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. माहिती विश्लेषण, विभागाची सर्व प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात करण्यात आल्याने करसंकलन विभागाला गतिमानता प्राप्त झाली असून तंत्रज्ञानस्नेही उपक्रमांचा महापालिकेच्या करसंकलनामध्ये मोलाचा वाटा आहे. महापालिकेच्या कोणत्याही विभागाला आज तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यांचा व विभागाचे डिजिटलायजेशन आणि त्याबरोबरच प्रभावी कम्युनिकेशन यांचा वापर करणे काळाची गरज बनली आहे. करसंकलन विभागाने या सर्व प्रकारांचा अवलंब करून विक्रमी यश संपादन केले असून ही महापालिकेसाठी अभिमानाची बाब आहे.
येत्या काळात विभागाची कार्यक्षमता लक्षात घेता पायाभूत सुविधेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून महापालिका त्यासाठी आग्रही आहे.
ते पुढे म्हणाले की शासकीय यंत्रणांनी खासगी क्षेत्रातील कार्यक्षमता ओळखून त्यांना शासकीय यंत्रणांशी जोडणे व यंत्रणांचे सुसूत्रीकरण होण्यास मदत घेणे गरजेचे आहे. येत्या काळात तंत्रज्ञानामुळे सर्व सेवा नागरिकांना सुलभरीत्या पोहोचविण्यासाठी महापालिका कटिबद्ध असणार आहे. जबाबदार करदात्यांच्या संख्येत जशी वाढ होत आहे, तशी आता नागरिकांच्या सुविधांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे शहराच्या सुनियोजित विकासाला चालना देण्याचा महापालिकेचा कायम प्रयत्न राहील.”
यावेळी विभागाच्या कार्याचा आढावा घेताना सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या अभियानांची माहिती दिली. याबरोबरच विभागाचे यश हे सर्व विभागातील कर्मचारी व विभागाशी जोडल्या गेलेल्या सर्वांचे सामूहिक यश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यावेळी त्यांनी करभरणा केलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले.
यावेळी सदाशिव कोंडे यांनी सूत्रसंचालन करीत मान्यवरांचे आभार मानले.