कारवाईची धग पोलीस आयुक्तांपर्यंत? – अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी!

0
128

कल्याणीनगर अपघात प्रकरणात माजी प्रशासकीय अधिकारी अरुण भाटिया यांनी थेट पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी केली आहे. यामुळे या प्रकरणातील कारवाईची धग पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. माजी प्रशासकीय अधिकारी अरुण भाटिया यांची पंतप्रधानांसह राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी केली आहे.

पुण्याचे माजी आयुक्त असलेल्या भाटिया यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मुख्यमंत्री, लोकायुक्त तसेच मुंबई उच्च न्यायालयााला पत्र पाठविले आहे. भाटिया यांनी सदर पत्रात म्हटले आहे की, ‘‘पुण्यात १९ मे रोजी वेगवान पोर्शे कारने दोन जणांना चिरडले. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला संरक्षण देण्यासाठी पुरावे नष्ट करण्यात आले. पुण्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी संगनमत केले आहे. मद्यसेवनाच्या चाचणीसाठी रक्ताचा नमुना घेण्यात पोलिसांनी सहा तासांपेक्षा जास्त उशीर केला. रक्त तपासणीपूर्वी पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात पिझ्झा खाऊ घातला. त्यानंतर डॉक्टरांनी नमुना नष्ट केला. साक्षीदार आणि गाडीतील इतरांचे जबाब नोंदवण्यास उशीर झाला.’’ या सगळ्यामध्ये तपासाचे मुलभूत नियम पाळण्यात आले नाहीत. दोषींना बचावासाठी वेळ उपलब्ध करून देण्यासाठीच हे करण्यात आले, असा आरोपदेखील भाटिया यांनी यात केला आहे.

आयपीएस अधिकारी असलेले पोलीस आयुक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देत आहेत. जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या अधीन काम करणाऱ्यांच्या गैरकृत्यांसाठी जबाबदार धरले जात नाही, तोपर्यंत सरकारी विभाग सुधारणार नाही. सर्व सरकारी विभागांत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. काय घडले आणि दोषी कोण आहे, हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी विद्यमान पोलीस आयुक्तांची तात्काळ पुण्याबाहेर तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणीदेखील भाटिया यांनी या पत्रात केली आहे.

भ्रष्ट अधिकारी आणि त्रासलेले नागरिक हे आता दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता भ्रष्टाचार व्यापक प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे वरच्या स्तरावरील भ्रष्टाचाराला आळा घालण्याची गरज भाटिया यांनी व्यक्त केली आहे.

या सर्व प्रकरणात पोलिस आयुक्तांचे अपयश आणि त्यांच्या विरोधाभासी विधानांकडे भाटिया यांनी लक्ष वेधले आहे. डॉक्टरांना वाचवण्यासाठी कोणताही राजकीय दबाव नसल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. नंतर त्यांनीच स्वत:च्या विधानाचे खंडन केले. पोलीस ठाण्यात एक आमदार आले होते, हे सत्य आहे, असेही भाटिया यांनी म्हटले आहे.

एका आमदाराच्या शिफारसीवर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणाऱ्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी. आरोग्य सचिवांनाही त्यासाठी जबाबदार धरण्यात यावे, अशीदेखील मागणी भाटिया यांनी केली आहे.

घटनांची क्रमवार माहिती, तपास प्रक्रियेतील विलंब आणि त्रुटींची कारणे याबाबत पोलिसांकडून अहवाल प्राप्त करून ताबडतोब सार्वजनिक डोमेनमध्ये आणणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी विद्यमान पोलीस आयुक्तांवर अवलंबून राहता येणार नाही, असे भाटिया यांनी पत्रात नमूद केले आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात कनिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन झाले. सर्व दोष स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही काही जबाबदारी आहे. त्यांना या प्रकरणातून वाचविण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी हे केले का, असा सवाल भाटिया यांनी केला. याबाबत आता प्रश्न विचारायला हवे, असेही ते म्हणाले.

पुण्यात आल्यापासून अमितेश कुमार यांची स्टंटबाजी : भाटिया

अमितेश कुमार यांची पुण्यात बदली झाल्यापासून त्यांनी स्टंटबाजी केली, अशी टीका अरुण भाटिया यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना केली. ते म्हणाले, ‘‘अमितेश कुमार यांनी स्वत:ची कठोर प्रशासक म्हणून प्रतिमा दाखविण्यासाठी भिकारी आणि तृतीयपंथियांवर ट्रॅफिक सिग्नल परिसरात बंदी घातली. हा केवळ स्टंट होता. गरिबांना त्यांचा दोष नसताना त्रास द्यायचा आणि दुसरीकडे श्रीमंत तसेच प्रभावी लोकांवर कारवाई करण्यास कचरायचे, हे दुहेरी मापदंड आहेत.’’