निगडी मेट्रोच्या कामास अखेर प्रारंभ, तीन वर्षांत काम पूर्ण होणार

0
129

पिंपरी ते भक्ती शक्ती (निगडी) चौकापर्यंत मेट्रोच्या कामास प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणातील नागरिकांचे मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विस्तारित मेट्रोच्या मार्गाचे साॅईल टेस्टिंग करून बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षात ४.५१ किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण नियोजन महा मेट्रोने केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) ते निगडी या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली. पुणे महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडीपर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाची ९१० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन ६ मार्च रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले होते. या मार्गाची लांबी ४.५१९ किलोमीटर असून या मार्गिकेचा खर्च ९१०.१८ कोटी इतका आहे. या विस्तारित मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. या मार्गिकेचे बांधकाम स्वीकृतीपत्र मिळाल्यापासून १३० आठवड्यांत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. (Nigdi-Pimpri Metro)

महापालिका ते चिंचवड स्थानकातील अंतर १.४६३ किलोमीटर, चिंचवड ते आकुर्डी स्थानकांतील अंतर १.६५१ किलोमीटर, आकुर्डी ते निगडी स्थानकांतील अंतर १.०६२ किलोमीटर आणि निगडी स्थानक ते भक्ती शक्ती चौक स्थानकांतील अंतर ९७५ मीटर असणार आहे.

या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि भक्ती-शक्ती चौक या स्थानकांचा समावेश असणार आहे. दरम्यान, निगडीतील भक्ती-शक्ती चौकात मेट्रोच्या खोदाई या कामाला आता सुरुवात झाली. भक्ती-शक्ती चौक आणि पवळे ब्रीज येथे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.

महामेट्रोकडून भक्ती-शक्तीसह मार्गावरील रस्त्याचे सुरुवातीला माती परीक्षण करून ले-आउट तयार करणार आहे. त्यानंतर पिलर बांधण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.

निगडीपर्यंत मेट्रो करा, नागरिकांची मागणी
पुणे महामेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात मोरवाडी पिंपरी ते फुगेवाडी असे काम करण्यात आले. त्यानंतर सिव्हिल कोर्टापर्यंत मार्ग पूर्ण करण्यात आला. तेथून पुढे स्वारगेटपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात आला. फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर ६ मार्च २०२२ रोजी तर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्गावर ऑगस्ट २०२३ प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र, स्वारगेट ते पिंपरी महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. त्यानुसार महामेट्रो’कडून निगडीपर्यंत मेट्रो विस्तारीकरण करण्यात येत आहे.