दि २६ मे (पीसीबी ) – सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्यक्ष चोऱ्या, लुटमार यापेक्षा कित्येक पटींनी सायबर गुन्हेगार ऑनलाईन माध्यमातून आर्थिक लूट करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 25) दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये तब्बल दोन कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
दिघी पोलीस ठाण्यात 53 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. 447771150983 आणि 447778434817 या क्रमांकावरून फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या मोबाईल नंबरला Vanguard DNP Group या व्हाटस अप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले. तिथे शेअर मार्केट मधून जास्त नफा कसा मिळतो हे भासवण्यात आले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना ट्रेडिंगचे अकाउंट तयार करण्यास सांगितले.
फिर्यादी आणि त्यांच्या भावाला आरोपींनी काही शेअर्स खरेदी करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी एक कोटी 67 लाख 80 हजार रुपये तर त्यांच्या भावाने 77 लाख 50 हजार रुपये शेअर मार्केट मध्ये लावले. त्यानंतर त्यांना कोणताही नफा झाला नाही. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाकडून घेतलेले एकूण दोन कोटी 45 लाख 30 हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली.