राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी ठाकरेंचं सरकार पडण्यापूर्वी घडलेली एका घटनेची वाच्यता केली आहे. देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौप्यस्फोट करतानाच अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात परमबीर सिंह मास्टरमाईंड होते, असा खळबळजनक दावा केला आहे.
‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे प्रतिज्ञापत्र पाठवले होते. ते देण्यास नकार दिल्यानंतर माझ्या घरी ईडीची धाड पडली, असे त्यांनी सांगितले.
“फडणवीसांनी फोन केला आणि म्हणाले…”
“एका दिवशी देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. ते म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला मदत करतोय. काही कागद पाठवतो. तुम्ही बघून घ्या.’ त्यांची इच्छा होती की, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी मी खोटी प्रतिज्ञापत्रे द्यावीत”, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “त्यामध्ये मला शरद पवारांवर आरोप करायला सांगितले होते. त्यात उद्धव ठाकरेंवर आरोप करायला सांगितले होते. त्यात आदित्य ठाकरेंवर आरोप करायला सांगितलेले होते.”
अनिल देशमुख पुढे म्हणाले की, “मी ते प्रतिज्ञापत्र वाचले आणि त्याच्या तोंडावर फेकलं आणि सांगितलं की, अनिल देशमुख आयुष्यभर तुरुंगात जाईल, पण तुमच्यासोबत तडजोड करणार नाही. हा तीन वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. ज्यादिवशी मी प्रतिज्ञापत्र द्यायला नकार दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्या घरी ईडीची धाड पडली.”
अंबानींच्या घरासमोर स्फोटके कुणी ठेवली?
देशमुख म्हणाले, “मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवले गेले. चौकशी अंतिम टप्प्यात होती, त्यावेळी ज्याने बॉम्ब ठेवले होते. त्याला वाटलं की, आपले नाव समोर येणार आहे. त्याने स्कॉर्पिओ गाडीचा चालकाची हत्या केली.”
परमबीर सिंह मास्टरमाईंड -देशमुख
“बॉम्ब ठेवण्याच्या, हत्या करण्याच्या प्रकरणात हे सगळे लोक सहभागी होते. विशेषतः परमबीर सिंह हे त्या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. माझ्या १०० कोटी घेतल्याचा आरोप केला. ईडीने आरोपपत्र दाखल केले, त्यात म्हटले की १ कोटी ७१ लाख रुपये. म्हणजे १०० कोटींचे प्रकरण १ कोटी ७१ लाखांवर आले”, असे खुलासे देशमुख यांनी केले आहेत.