उजणी धरणात काल संध्याकाळी वादळी वारा आणि पावसाने बोट उलटून अपघात झाला होता. त्यात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी रात्री शोध मोहिम थांबविण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. त्यात बुडालेली लाँच सापडली होती. NDRF पथकाने शोध मोहिम राबविल्यानंतर सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बेपत्ता सहा जणांत 1) कृष्णा दत्तू जाधव 28 वर्ष, 2) कोमल कृष्णा जाधव 25 वर्ष, 3) वैभवी कृष्णा जाधव 2.5 वर्ष, 4) समर्थ कृष्णा जाधव 1 वर्ष रा. झरे ता. करमाळा, 5) गौरव धनंजय डोंगरे 21 वर्ष, 6) अनिकेत ज्ञानदेव अवघडे 21 वर्ष रा कुगांव. ता. करमाळा यांचा समावेश आहे.
घटनास्थळी 35 फूट पाण्याखाली एका खडकावर बोट अडकली. त्याठिकाणी चप्पल, पर्स, हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या आहेत. लवकरच पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसेस विजय दशरथ शिवतारे वारजे माळवाडी टीम दाखल झाली आहे. बनारसी चौहान ही व्यक्ती आता तळाशी शोध घेणार आहे. करमाळा आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडली आहे.
करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जोरदार हवेने प्रवासात अडथळे येत होते. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. बोट भीमा नदीत बुडाली. या नावेत एकूण सात प्रवासी होते. त्यात एक वर्षांचे मुल असल्याचे समोर येत आहे. त्यातील एक प्रवाशी पोहता येत असल्याने पोहत किनाऱ्यावर आला. वादळी वारे आणि जोरदार पावसाने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.