मधुश्री व्याख्यानमाला – अंतिम पुष्प
पिंपरी (दिनांक : १९ मे २०२४) “सुख आणि दुःख कृष्णार्पण करणे हाच गीतासार आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक १८ मे २०२४ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘गीतासार – जगण्याचा आधार’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना राज अहेरराव बोलत होते. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानापूर्वी, आदर्श गृहरचना संस्था म्हणून निसर्गदर्शन, स्वप्नपूर्ती फेज – २, जानकीबन, गजानन, टेल्को हैसिंग आणि सामाजिक कार्यासाठी दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था या संस्थांना सन्मानित करण्यात आले. माधुरी ओक यांनी प्रास्ताविकातून मधुश्री कला आविष्कार ही संस्था सांस्कृतिक क्षेत्रात वीस वर्षांपासून कार्यरत असून चौदा वर्षांपासून मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहे, अशी माहिती दिली. प्रदीप पवार यांनी अध्यक्षीय मनोगतातून दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था चोवीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमात कार्यरत आहे, अशी माहिती देत “समाजजीवन ही एक शाळा आहे!” असे मत व्यक्त केले.
राज अहेरराव पुढे म्हणाले की, “अठरा अध्याय आणि ७०० श्लोकांच्या माध्यमातून चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे आणि उपनिषदांचा सारांश असलेली भगवद्गीता ज्ञानेश्वरमाउलींनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. मानवी जीवनात प्रत्येकाला प्रारब्धानुसार भोग भोगावे लागतात; मात्र त्याची तीव्रता कमी करण्यात गीता उपयोगी आहे. आधुनिक अभियांत्रिकी शाखेतील व्हाय – व्हाय अनॅलिसिस भगवद्गीतेत आढळून येते. या अनॅलिसिसमुळे जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतात. त्यामुळे तारुण्यातच गीताभ्यास करून उर्वरित आयुष्य सुलभ करता येते. द्वेषरहित भगवद्गीतेचे श्रवण हा पापमुक्तीचा मार्ग आहे.
कुरुक्षेत्रावर होऊ घातलेल्या महायुद्धाविषयी अपार उत्सुकता असल्याने धृतराष्ट्राने दिव्य दृष्टी असलेल्या संजयला रणभूमीवरील सविस्तर वृत्तान्त कथन करण्याची विनंती केली. त्यामुळे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद भगवद्गीतेच्या रूपाने आविष्कृत झाला. अर्जुनाच्या एकूण अठरा प्रश्नांतून गीतेचा विस्तार झाला. त्या श्लोकांपैकी ५७४ श्रीकृष्णाचे, ८५ अर्जुनाचे, ४० संजयचे आणि १ धृतराष्ट्राचा असे वर्गीकरण आहे. सांख्य, कर्म, ध्यान, ज्ञान, विभूती, भक्ती अशा अठरा योगांचा ऊहापोह गीतेमध्ये आहे. जीवनात वाट्याला येणाऱ्या कर्मांना सामोरे जाणे म्हणजे युद्धच आहे. प्रत्येक जण फळाची अपेक्षा ठेवून सकाम कर्म करतो; परंतु कर्मफळाचा त्याग करणे ही ईश्वराकडे जाणारी पहिली पायरी होय. यासाठी इंद्रियनियमन आवश्यक आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजीमहाराज कर्मयोग गुणांच्या आधारे श्रीकृष्णाचे अवतार वाटतात. रजोगुण, तमोगुण आणि सत्त्वगुण यामध्ये समतोल हवा. भोजन हा एक यज्ञ असल्याने प्रकृतीनुसार आहार हवा. दान सात्त्विक हवे. सुख आणि दुःख यांकडे समतोल दृष्टिकोन ठेवून पाहण्यास भगवद्गीता शिकवते!”
रमेश वाकनीस, मिलिंद कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, विनायक गुहे, मनीषा मुळे, सुनील देशपांडे, नेहा कुलकर्णी, रेणुका हजारे, चंद्रकांत शेडगे, पी. बी. शिंदे यांनी संयोजनात सहकार्य केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. चिंतामणी कुलकर्णी यांनी आभार मानले. पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.