श्रीकांत शिंदेंची संपत्ती ६६९ टक्के वेगाने वाढली, मुंबईत सर्वाधिक १११ कोटींवाले धनाढ्य उमेदवार ठरले…

0
131

लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. त्यात मुंबईतील सहा मतदार संघात मतदान होणार आहे. या मतदार संघात प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचवेळी ‘मुंबई वोट्स’ या संस्थेने मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणत्या उमेदवाराची संपत्ती किती वाढली? कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत? याचा अहवाल तयार केला आहे. ‘मुंबई वोट्स’ या संस्थेच्या अहवालानुसार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पीयूष गोयल सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. गोयल यांच्याकडे ११०.९६ कोटींची संपत्ती आहे. तसेच विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.

पीयूष गोयल यांच्यानंतर रवींद्र वायकर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ५४.२१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. तसेच भारत जन आधार पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरिंदर अरोरा यांच्याकडे ४०.४७ कोटीं संपत्ती आहे.

सर्वाधिक संपत्ती खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढली आहे. त्यांच्या संपत्ती वाढीचा वेग ६६९ टक्के आहे. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांची संपत्ती वाढली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ ६१९ टक्के राहिली. काँग्रेसचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भूषण पाटील यांची संपत्ती ४८३ टक्के वाढली आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्ती वाढीचा दर केवळ ३.५ टक्के आहे.