चिंचवड विधानसभेसाठी संदीप चिंचवडेंची मोर्चेबांधनी सुरू

0
291

मावळ लोकसभा मतदारसंघीलत मतदान संपत नाही तोच आता चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा मतदारसंघाची मोर्चेबांधनी अनेक इच्छुकांनी सुरू केली आहे. चिंचवडगाव येथील माजी नगरसेवक आणि पेशाने वकिल असलेल्या संदीप चिंचवडे यांनी आपल्या मित्रांच्या माहितीसाठी एक विस्तृत प्रसिध्दीपत्रक काढले असून त्यात आपण विधानसभा लढविण्याचा दृढनिश्चय केला आहे, असे जाहीर केले.

लोकसभा निवडणूक निकाल ४ जून रोजी आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार की नाही याबाबत संभ्रमावस्था असल्याने गेल्या काही काळात पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या अनेकांची अस्वस्थता वाढली आहे. महाआघाडी आणि महायुती आगामी विधानसभेसाठी असेलच याची शाश्वती दिसत नाही. विधानसभेची निवडणूक साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान होईल. अवघ्या चार महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने अचूक वेळ साधून चिंचवडे यांनी आपला निर्णय जाहीर केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

चिंचवड विधानसभेसाठी २०१९ मध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप हे भाजपकडून आमदार होते. आजारपणातून त्यांचे निधन झाले आणि पोटनिवडणुकित त्यांच्या पत्नी आश्विनी जगताप या भाजपच्या तिकीटावर आमदार झाल्या. कमी अवधी मिळाल्याने २०२४ साठी आश्विनीताईंनी पुन्हा तयारी सुरू केली आहे. त्यांचे दिर आणि शहर भाजपचे अध्यक्ष शंकरशेठ जगताप हे सुध्दी तीव्र इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटातून दोन वेळा विधानसभेचे रिंगण गाजवलेले आणि सर्वपक्षांचे उमेदवार असताना तब्बल १ लाख ११ हजार मते मिळविणारे माजी गटनेते राहुल कलाटे यांचे नावसुध्दा यावेळेस स्पर्धेत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि पोटनिवडणुकित ९९ हजार मते घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ माजी नगरसेवक नाना काटे हेसुध्दा लढण्यासाठी दंड थोपटून तयार आहेत. सर्वात जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचेही नाव राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी घेतले जाते. अशातच आता वकिल संदिप चिंचवडे यांनी स्वतःचे घोडे रिंगणात सोडल्याने रंगत वाढणार आहे.

चिंचवडे यांनी प्रसिध्द केलेले पत्रक जसेच्या तसे देत आहोत. पत्रात ते म्हणतात,

प्रिय मित्रा
लहानपणापासून आपण सर्व एकत्र शिकलो हिंडलो फिरलो अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या कधी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झालो कधी भेटणे जमले नाही तरी पण एकमेकांबद्दल असच प्रेम जिव्हाळा राहिला काही जण आपल्याला सोडून गेले त्याचे दुःख सर्वांना आहेच. आपण एकमेकांना मदत करत करत आपण चालत राहिलो

मित्रांनो तुमचा एक जवळचा मिञ आज महत्वाचा आणि अवघड पण अशक्य नाही असा निर्णय घेत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी मी निर्णय घेतलेला आहे. त्यासाठीच मी चिंचवड विधानसभा निवडणूक 2024 लढविण्याचा दृढ निश्चय केला आहे.

तुमच्या आजपर्यंतच्या ज्ञानाची कामाची अनुभवाची मला खरंच खूप गरज भासणार आहे.आपण आपल्या परीने मला शक्य तितकी मदत करावी असे मनापासून वाटत आहे.

तुमचा एक मित्र महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडण्यासाठी,महाराष्ट्राचा सर्वांगीण शाश्वत असा विकास करण्यासाठी लढणार आहे.तुम्हा सर्वांची साथ मला हवी आहे आणि तुम्ही ती द्यालच याचा विश्वास आहे

आपला –
ॲड संदीप चिंचवडे
मा. नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका
उपाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र