रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकला एका दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 13) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर, ओंकार ब्रिजवर बावधन येथे घडली.
प्रदीप परशुराम चौधरी (वय 27, रा. उंड्री, ता. हवेली, पुणे. मूळ रा. नेपाळ), कृष्णा लहानू डंगोरा (वय 25, रा. वडगाव, पुणे. मूळ रा. नेपाळ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक तानाजी टकले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक (एमएच 14/एफटी 2707) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक मुंबई-बेंगलोर महामार्गावर ओंकार ब्रिजवर बावधन येथे कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता पार्क केला. दरम्यान, प्रदीप आणि कृष्ण हे दुचाकीवरून जात होते. त्यांना रस्त्यात पार्क केलेला ट्रक दिसला नसल्याने त्यांच्या दुचाकीची ट्रकला धडक बसली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.












































