मावळ मतदारसंघात ५२.३० टक्के मतदान

0
206

वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात सहभाग घेतला. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली असून अंदाजे सरासरी ५२.३० टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

आपल्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना युवा युवतींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रांवर दिलेल्या विविध सोयीसुविधांबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले.

मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी
आज मावळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड पिंपरी असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३८ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदानाचे प्रमाण उरण विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून आले.

सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात साधारणपणे तिपटीने वाढ होऊन ते १४. ८७ टक्के इतके झाले. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २७.१४ टक्के इतके झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ३६.५४ टक्के मतदान पार पडले. ५ वाजेपर्यंत सरासरी ४६.०३ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते.

मॉकपोलवेळी आणि मतदान प्रक्रियेवेळी बदलण्यात आलेल्या यंत्रांची माहिती
सकाळी मतदानापुर्वी झालेल्या मॉक पोलवेळी २५ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. यामध्ये पनवेल (१ बीयु, ३ व्हीव्हीपॅट), कर्जत (३ बीयु, २ व्हीव्हीपॅट), उरण (६ बीयु, २ व्हीव्हीपॅट), मावळ (३ बीयु, १ सीयु, ४ व्हीव्हीपॅट), चिंचवड (९ बीयु, ३ सीयु, २ व्हीव्हीपॅट), पिंपरी (३ बीयु, २ सीयु, १ व्हीव्हीपॅट) मतदान यंत्रांचा समावेश होता.

मतदान प्रक्रिया सुरू असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघात १२ बीयु, ४ सीयु आणि ६ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. तर पनवेलमध्ये ४ व्हीव्हीपॅट, कर्जतमध्ये ५ व्हीव्हीपॅट, उरणमध्ये २ व्हीव्हीपॅट, मावळ ६ व्हीव्हीपॅट आणि पिंपरी २ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले.

कंट्रोल रुमद्वारे लक्ष
मावळ लोकसभेतील मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते. याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात देखील नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला होता. यामध्ये अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी आणि अर्चना यादव यांच्याद्वारे मतदान केंद्रावर लक्ष ठेवले जात होते. तसेच समन्वयासाठी समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे हे देखील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित राहून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधत होते. निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली.

निवडणूक निरीक्षक व निवडणूक खर्च निरीक्षकांची विविध मतदान केंद्रांना भेट
निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर तसेच निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी भर उन्हात देखील मोठ्या संख्येने मतदार मतदान करण्यासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मावळ मतदारसंघात आदर्श मतदान केंद्र आणि विशेष केंद्र ठरले मतदारांचे आकर्षण
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रे विशेष स्वरूपात सजविण्यात आली होती. त्यामध्ये महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी नियुक्त महिला पोलीस अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. युवा संचलित मतदान केंद्रावर युवा वयोगटातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित मतदान केंद्रेही साकारण्यात आली होती. तर कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळाच्या संकल्पना साकारण्यात आली होती. तसेच आदर्श मतदान केंद्रावर मतदानाच्या अनुषंगाने सर्व सेवासुविधा आणि आवश्यक त्या अतिरिक्त सुविधांसह संस्कृती दर्शवणारी रचना करण्यात आली होती. अशी सर्व मिळून १४ महिला संचलित मतदान केंद्रे, १४ युवा संचलित मतदान केंद्र आणि ६ संस्कृती जोपासणारे व ३४ आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, एन सी आर डी स्टर्लिंग स्कूल भोसरी, ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी, डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज शाहूनगर येथे असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर संकल्पित हरीत मतदान केंद्र साकारण्यात आली होती. या हरित मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना विविध जातीच्या वनस्पती तसेच वृक्षांच्या प्रजातींबद्दल माहिती जाणून घेतली.

मतदारांसाठी विविध सोयीसुविधा
प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस सह वैद्यकीय सुविधा, आशा सेविका, प्रतीक्षा कक्ष तसेच पाळणाघर, हिरकणी कक्ष, व्हिलचेअर, व्हिलचेअर मदतनीस, उन्हापासून संरक्षणासाठी शेड व मंडप, वाहनतळ इ. सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आल्याने ज्येष्ठ मतदारांसह दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाकडून पुष्प देऊन स्वागत केल्याचा क्षण मतदारांसाठी उत्साह वाढविणारा ठरला. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मतदारांसाठी सेल्फी पॉइंट्स
मतदान जनजागृतीबाबत सुविचार, घोषवाक्ये, आकर्षक छायाचित्रे अशी सजावट करून मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी काढली. यामध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

मतदान केंद्रावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह सुरक्षितपणे नेमून दिलेल्या स्थळी घेऊन येण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली. मतदान यंत्रे निश्चित केलेल्या ठिकाणी संकलित करून बालेवाडी येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्ष (स्ट्रॉन्ग रूम) येथे सुरक्षित जमा केले जाणार आहेत.

सरासरी टक्केवारी-
पुणे लोकसभा मतदारसंघ- ५०.५०
शिरूर लोकसभा मतदारसंघ- ४७.५०
मावळ लोकसभा मतदारसंघ- ५२.३०