पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत चौकशीच्या बहाण्याने १० लाख ४९ हजारांची फसवणूक

0
146

मुंबईहून तैवान येथे पाठवण्यासाठी तुमच्या नावाने पार्सल आले असून त्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत. ते मुंबई कस्टम आणि मुंबई पोलिसांनी पकडले असून पुढील चौकशी करण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तींनी महिलेची १० लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार शनिवारी (दि. ४) सायंकाळी सुस पाषाण रोडवर घडला.

याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8183441052 क्रमांक धारक आणि मुंबई नार्कोटिक्स सेल नावाचा स्काईप आयडी धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस फोन केला. फिर्यादीच्या नाव आणि आधार क्रमांकावर मुंबई ते तैवान येथे पाठवण्यासाठी एक बेकायदेशीर पार्सल आले असून त्यात कपडे, लॅपटॉप आणि ६०० ग्रॅम एमडी ड्रग्ज आहे. ते पार्सल मुंबई कस्टम आणि मुंबई पोलिसांनी पकडले आहे. तुमची चौकशी करायची आहे. तुमचे आधारवार्ड तीन वेगवेगळ्या क्रिमिनल अकाउंटशी लिंक आहे, असे आरोपींनी खोटे सांगितले.

त्यानंतर फिर्यादीस व्हिडीओ कॉल करण्यास सांगून फेडेक्स कुरिअर कंपनीमध्ये कुरिअरची लिंक काढायची असेल तर पाच लाख रुपये आम्ही सांगू त्या खात्यावर पाठवावे लागतील, असे फिर्यादीस सांगण्यात आले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस आरबीआयचे बनावट पत्र पाठवून त्यांच्याकडून व्हेरिफिकेशनच्या नावाखाली १० लाख ४९ हजार ३६० रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.