“संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा हे कलाम यांचे स्वप्न पूर्ण!” – काशिनाथ देवधर

0
91

छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला – अंतिम पुष्प

दि ६ मे (पीसीबी ) – “संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा हे मिसाईलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे!” असे प्रतिपादन ए. आर. डी. ई., पुणे मधील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेतील ‘भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावरील अंतिम पुष्पाची गुंफण करताना काशिनाथ देवधर बोलत होते. जनसेवा सहकारी बँकेचे संचालक राजन वडके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, मंडळाचे सचिव सागर पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

काशिनाथ देवधर पुढे म्हणाले की, “अमेरिकेतून अण्वस्त्र तंत्रज्ञान अवगत केल्यावर अब्दुल कलाम यांना नासा या संस्थेमार्फत लठ्ठ पगाराच्या नोकरीसह अनेक सुविधांचे आमिष दाखविण्यात आले होते; परंतु सर्व प्रलोभनांना दूर सारून ते भारतात परतले. त्यावेळी भारतीय अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात मूलभूत सुविधांसह अनेक गोष्टींची वानवा होती. विविध प्रकारचे तंत्रज्ञान आणि संरक्षण सामुग्री परदेशातून आयात करावी लागत होती. कठोर परिश्रम घेऊन डॉ. अब्दुल कलाम, त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ यांनी अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदानातून यश संपादन केले. तत्कालीन केंद्र सरकारकडून याबाबत सक्षम पाठबळ मिळत नसल्याने बोफोर्स तोफांच्या खरेदीनंतर तोफा आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश अशी भारताची प्रसिद्धी झाली होती.

“११ मे १९९८ रोजी यशस्वी अण्वस्त्र चाचणीमुळे भारत जगातील मोजक्याच अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंगतीत जाऊन बसला. अर्थातच त्यामुळे आर्थिक निर्बंधांसह अनेक गोष्टींवर प्रतिबंध लादण्यात आला; परंतु ही इष्टापत्ती मानून भारताने अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी अशी क्षेपणास्त्रे निर्माण करून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला. आक्रमण हेच संरक्षण हा अलिखित नियम युद्धशास्त्रात मानला जातो. तसेच तुमच्या संस्कृतीचे तत्त्वज्ञान कितीही प्रभावी आणि मानवतावादी असले तरी संरक्षणक्षमता मजबूत असल्याशिवाय जगात तुम्हाला कोणी किंमत देत नाही, हे सत्य भारताला उमगले. आपली अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे ही आपल्या संस्कृतीची ओळख सांगणारी असावीत, अशी कलाम यांची इच्छा असल्याने त्यांचे नामकरण वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले आहे.

“कारगिल युद्धात हिमालयातील पर्वतरांगांमध्ये वाहून नेता येतील अशा हलक्या वजनाच्या तोफा निर्माण करण्याचे आव्हान ए. आर. डी. ई. पुढे होते. ते यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांची चाचणी थेट कारगिल युद्धभूमीवर घेण्यात आली. या संदर्भात कलाम यांनी माझ्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यांची उत्कट इच्छाशक्ती आणि ध्यास यामुळेच भारताने भूदल, नौदल, हवाईदल अशा तिन्ही प्रकारात वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून आत्मनिर्भरता संपादन केली आहे. विशेषत: २०१४ नंतर या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय यश संपादन केले. एकेकाळी संरक्षण तंत्रज्ञान आणि सामुग्री आयात करणारा भारत या क्षेत्रातील प्रमुख निर्यातदार झाला आहे. अर्जुन रणगाडे ७५२३ कोटी रुपयांची ऑर्डर, पीनाक रॉकेट ११००० कोटी रुपयांची ऑर्डर, तोफा ३३५६ कोटी रुपयांची ऑर्डर, तेजस विमाने ४८००० कोटी रुपयांची ऑर्डर या आणि अशा स्वरूपाची अन्य आकडेवारी भारताच्या आत्मनिर्भरतेची ग्वाही देत आहेत!”

गोविंद लाटकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदानाविषयी प्रबोधन केले. हर्षदा पोरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मनीषा मुळे यांनी व्यासपीठ व्यवस्था सांभाळली. मंडळाचे सहसचिव राजेंद्र देशपांडे यांनी आभार मानले. पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.