खासदार झाल्यावर टिपू सुलतान यांचे भव्य स्मारक उभारणार

0
121

दि ६ मे (पीसीबी ) – देशभरात लोकसभा निवडणुकी प्रचाराने चांगलाच जोर पकडला असून प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके या चारही उमेदवारांकडून प्रचार करण्यात येत आहे. या प्रचारा दरम्यान प्रत्येक उमदेवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

या सर्व घडामोडी दरम्यान एमआयएमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके हे एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. ते प्रचारावेळी म्हणाले ” पुणे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, बेरोजगारी यासह अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. मी पुणे शहराचा खासदार झाल्यावर पुणेकर नागरिकांना सर्व समस्यांमधून मुक्त करणार आहे. तसेच देशभरात विविध महान व्यक्तींची स्मारकं आहेत. या स्मारकाच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रत्येक स्मारक प्रेरणा देत आले आहेत. त्यामुळे मी पुण्याचा खासदार झाल्यावर टिपू सुलतान यांचं कार्य लक्षात घेऊन मी भव्य असे स्मारक उभारणार. ” सुंडके यांच्या या विधानामुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.