काँग्रेस राजवटीत 100 पैकी 15 रुपयांचा निधीच लोकांपर्यंत पोहोचायचा – चित्रा वाघ

0
125

शासकीय निधी मोदींनी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला – चित्रा वाघ

मोदी सरकारचे निर्णय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा – चित्रा वाघ

दि ६ मे (पीसीबी ) – लोणावळा – काँग्रेस राजवटीमध्ये 100 पैकी 15 रुपयांचा शासकीय निधी लोकांपर्यंत पोहोचत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केल्यामुळे 100 टक्के निधी लोकांपर्यंत पोहोचत आहे. मोदी सरकारच्या निर्णयांची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी सूचना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी लोणावळा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चित्रा वाघ बोलत होत्या.

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे आवश्यक आहे. त्यासाठी श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आरपीआय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय तथा भाऊ गुंड, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, मावळ भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे, लोणावळा शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा विजया वाळुंज, लोणावळा शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाळेकर यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.