चाळीत प्रचारासाठी रोखल्याने मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद

0
95

मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडत आहे. हे मतदान संपल्यानंतर पुढील टप्प्याची निवडणूक ही मुंबई आणि पुण्यात असेल. मुंबईत शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असल्याने 20 मे पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे केंद्रस्थान मुंबईत असेल. त्यामुळे साहजिकच आगामी 15 दिवसांत मुंबईतील प्रचाराचा जोर वाढेल. मात्र, त्यापूर्वीच मुंबईत घडलेल्या एका घटनेमुळे प्रचाराची हवा चांगलीच तापण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईतील एका गुजराती रहिवाशांच्या सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन मतदानापूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. रविवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे शिवसैनिक घाटकोपर पश्चिम परिसरात निवडणुकीचा प्रचार करत होते. या भागात असणाऱ्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीच्या आवारात येण्यापासून मज्जाव करण्यात आला. तुम्हाला सोसायटीत प्रचार करता येणार नाही, असे सोसायटीच्या लोकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती हा वाद तापण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान संपून मुंबईत जेव्हा शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरु होईल तेव्हा या मुद्द्यावरुन वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवाशांकडून प्रचारापासून रोखले जात असल्याचा आरोप स्थानिक शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

भाजप आमदार राम कदमांचा घरोघरी प्रचार
ईशान्य मुंबई मतदारसंघातील गुजराती मतदार हा भाजपची हक्काची व्होटबँक समजला जातो. गुजराती समाज हा एकगठ्ठा भाजपला मतदान करतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुजराती मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, आता ठाकरे गटाला गुजराती सोसायटीत प्रवेश नाकारण्यात आला आहे. याउलट भाजपचे स्थानिक आमदार राम कदम हे गुजराती रहिवाशी असलेल्या सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहे. अगदी रात्री उशीरापर्यंत राम कदम हे प्रत्येक सोसायटीत जाऊन रहिवाशांच्या छोटेखानी बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये राम कदम हे देशात पुन्हा पंतप्रधान मोदींचे सरकार येणे, किती गरजेचे आहे, हे रहिवाशांना सांगत आहेत.