शहरातील नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच मतदार नोंदणी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांचाही प्रतिसाद तितकाच महत्वाचा असून लोकशाहीच्या महाउत्सवात सामिल होऊन देशाच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी मतदारांनी उस्फुर्तपणे आपल्या मताचा अधिकार बजवावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी २ एलईडी व्हॅनद्वारे प्रचार, प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या व्हॅनचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे उप आयुक्त आण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील मतदानाचा टक्का वाढावा आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी एलईडी व्हॅनच्या माध्यमातून चित्रफित दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे. या एलईडी व्हॅन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील वर्दळीची ठिकाणे, उद्याने, रुग्णालये, सिनेमाघरे तसेच महत्वाचे चौकांमध्ये देखील या व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. महत्वाच्या शंभर चौकांमध्ये या व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना प्राप्त झालेल्या मताच्या अधिकाराबद्दल जाणीव जागृती करून मतदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. महापालिकेच्या वतीने मतदारांना आपला मताधिकार बजावण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम तसेच माध्यमांचा वापर करून मतदान प्रक्रियेबद्दल माहिती दिली जात आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये मतदान करण्याची शपथही देण्यात येत आहे. शिवाय पथनाट्य, जिंगल्स, सांस्कृतिक कार्यक्रम इ. माध्यमांद्वारे मतदान जनजागृतीबाबत प्रचार केला जात आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील महत्वाच्या मार्गांवर उद्या दि. ४ मे रोजी सकाळी ८ वाजता भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे जनजागृती आणि वातावरण निर्मिती केली जाणार आहे, असेही सहाय्यक आयुक्त शिंदे यावेळी म्हणाले.