तहसीलदारांकडे मुरूम उत्खननाविषयी माहिती मागितल्याने पत्रकारास मारहाण

0
217

मुरूम वाहतुकीचा नागरिकांना त्रास होत असल्याने त्याबाबत पत्रकाराने तहसीलदारांकडे माहिती मागितली. त्यावरून मुरूम वाहतूक करणाऱ्या दोघांनी पत्रकारास मारहाण करून अटकावून ठेवले. ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील शेलगाव येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

विश्वजित विजय दीक्षित (वय 24, रा. तुळापुर, ता. हवेली), आकाश मच्छिंद्र शिवले (वय 20, फुलगाव, ता. हवेली), मारुती पांडुरंग शिवले (वय 33, रा. तुळापुर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पत्रकार तुषार झरेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलगाव येथील माती व मुरूम उपसा करून रस्त्याने होणाऱ्या वाहतुकीचा स्थानिक नागरिकांना व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याने त्याबाबत बातमी करण्यासाठी झरेकर यांनी तहसीलदारांकडे माहिती मागितली. त्यावरून आरोपींनी झरेकर यांना 1 मे रोजी शेलगाव येथे बोलावून घेतले. त्यांच्याशी बोलत असताना त्यांना आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘आमच्या विरोधात तहसीलदारांकडे तक्रार करतो का’ असे म्हणून शिवीगाळ करत त्यांना मारहाण करून अटकावून ठेवले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.