विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने कोपर्डी (ता. कर्जत) येथील दलित तरुणाने आत्महत्या केली, यासंदर्भात तीनपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बंटी बाबासाहेब सुद्रिक व वैभव मधुकर सुद्रिक अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आणखी एका आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या कोपर्डी गावात शांतता असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी ही माहिती दिली. या गुन्ह्याचा तपास वाखारे करत आहेत. या घटनेने कोपर्डी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सन २०१६ मध्ये कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी कोपर्डी गावातील तमाशामध्ये नाचण्याच्या कारणावरून विठ्ठल उर्फ नितीन कांतीलाल शिंदे (३७) याला तिघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर गोंधळ निर्माण होऊन तमाशा बंद पडला. नितीन घरी परतत असताना रस्त्यात त्याला तिघांनी अडवले व गावातील स्मशानभूमीमध्ये नेत त्याला विवस्त्र केले, मारहाण केली, त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला.
दुसऱ्या दिवशी त्याने घरी निरोप पाठवून कुटुंबीयांकडून कपडे मागून घेतले व नंतर तो घरी आला. या घटनेमुळे नैराश्य आलेल्या नितीनने दुसऱ्या दिवशी, गुरुवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने घडलेल्या घटनेसंदर्भात चिठ्ठी लिहिली होती.
यासंदर्भात नितीनचे वडील कांतीलाल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश उर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक व वैभव मधुकर सुद्रिक (तिघेही रा. कोपर्डी, कर्जत) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील दोन आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयापुढे हजर केले जाईल.