लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

0
148

शिरुर – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या दोघांनीही एकमेकांना आवाहन दिले आहे. माजी खासदार केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. त्यांनी ७० पेक्षा अधिक प्रश्न संसदेत आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी विचारले असल्याचा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ओतूर येथील भाषणात केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी डॉ. कोल्हे यांना आवाहन दिले होते की, पुरावे द्यावेत मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो, अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावं.

यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील आढळराव पाटील यांचे आवाहन स्वीकारत मी पुरावे घेऊन येतोय निवडणुकीतुन माघार घेण्याची तयारी करा असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर आज (दि.०३) रोजी शिरुर तालुक्यात मतदारांशी संवाद साधत असताना डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचे नाव न घेता लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी म्हणून उल्लेख करत आढळराव यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.

एवढ्यावरच न थांबता डॉ. कोल्हे यांनी शब्दाला माणूस पक्का असेल तर मघारीची तयारी ठेवावी असा सल्लाही आढळराव पाटील यांना दिला. पुढे डॉ. कोल्हे म्हणाले की, मी कोणाच्या व्यवसायावर बोलत नाही परंतु मला नटसम्राट आणि यापेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची. मतदारसंघात आल्यावर सांगतात मी तुमच्यासाठी काम करतो मात्र दिल्लीत गेल्यावर स्वतःच्या कंपनीचा कसा नफा होईल यासाठी प्रयत्न करायचा हे काम माजी खासदार करत होते असं मत यावेळी डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार अशोक पवार, विश्वास ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, पोपट शेलार, संभाजी फराटे, दत्तात्रय फराटे, शंकर फराटे, सुभाष कळसकर, संजय देशमुख, जीवन तांबे, शरद निंबाळकर, राहुल करपे, गोरक्ष गदाडे, मच्छिन्द्र गदादे यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.