हॉट… हॉट… हॉट…पुण्याचा पारा ४३ अंशावर

0
123

पुण्यातील शिवाजीनगर येथे यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचा रविवारी उच्चांक झाला. शहरात 41.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तळेगाव ढमढेरे येथे 43.4 आणि कोरेगाव पार्क येथे 43.3 कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज ही हवामान खात्यातर्फे शनिवारी वर्तविण्यात आला.

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका लागत होता. दुपारी 11 वाजल्यानंतर उन्हाच्या चटक्याची तीव्रता वाढली. दुपारी चारपर्यंत उन्हाचा भयंकर चटका जाणवत होता. रविवार सुटीच्या दिवशी रस्त्यावर वाहतूक कमी होती. पण, इतर रविवारी जाणवणारी तुरळक गर्दीची दुपारी 12 ते तीन या वेळेत जाणवत नव्हती. कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी टोपी, गॉगल घातला होता. पूर्ण चेहरा झाकून घेऊन दुचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी दिसत होते. रस्त्यावर ठिकठिकाणी शीतपेये विक्रेत्यांच्या दुकानावर नागरिकांनी गर्दी केल्याचेही चित्र शहरात रविवारी दिसले. पुणे शहरात यंदाच्या उन्हाळ्यात गुरुवारी (दि.18) आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 41 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.