गुजराती व राजस्थानी बांधवांचा खासदार बारणे यांना एकमुखी पाठिंबा

0
211
  • गुजराती व राजस्थानी समाजाचा संपूर्ण देशाला अभिमान – प्रशांत ठाकूर
  • केंद्रातील भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनी संपवला – श्रीरंग बारणे

खारघर – पनवेल विधानसभा मतदारसंघातील गुजराती व राजस्थानी बांधवांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना आज (रविवारी) एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

खारघर येथे झालेल्या गुजराती व राजस्थानी समाज संमेलनात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. चंदन तिलक लावून व गुजराती पगडी घालून यावेळी बारणे यांचा सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर खासदार बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवदास कांबळे तसेच प्रवीण पाटील, प्रथमेश सोमण, ब्रिजेश पटेल, आशिष पटेल, प्रवीण बेरा, कांतीभाई बामाणी, मोतीलाल जैन, विनोद बाफना, जीवजी पटेल, नीलेश बातेसरा, नारायण भाई, देवजीभाई चौधरी, हसमुख पटेल, कमल कोठारी, कुणाल सांगानी, अंबाबाई पटेल, संजय जैन, कविता चोथमल तसेच राजस्थानी व गुजराती बांधवांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार ठाकूर म्हणाले की, गुजराती व राजस्थानी समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यामुळे या दोन्ही समाजांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. दुकान, व्यवसाय या माध्यमातून या समाजाचा खूप लोकांशी दररोज संपर्क येतो. त्यामुळे कोणाला निवडून आणायचे, हे ही मंडळीच ठरवतात. देशाचा विकास कोणी केला, देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे, हे त्यांना चांगले माहीत आहे.

झारखंडमधील जैन समाजाचे तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरुद्ध आपण संसदेत आवाज उठवला होता, याकडे खासदार बारणे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पनवेल ते जेएनपीटी आठ पदरी रस्ता, अटल सेतू, नवीन विमानतळ, रेल्वे सुधारणा, मेट्रो, ग्रामीण भागात रस्ते व वीज पुरवठा अशा विविध कामांचा आढावा त्यांनी सादर केला. केंद्रातील भ्रष्टाचार मोदींनी संपवला, असेही ते म्हणाले. आपल्याकडून एखादे काम कमी होईल पण चुकीचे एकही काम आपण करणार नाही, अशी ग्वाही बारणे यांनी यावेळी दिली.

‘अब की बार, 400 पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘तिसरी बार, आप्पा बारणे खासदार’ अशा घोषणा देत गुजराती व राजस्थानी बांधवांनी खासदार बारणे यांना शुभेच्छा दिल्या.