दि २८ एप्रिल (पीसीबी ) – गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सावध पावित्रा घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे हे सक्रिय झाले आहेत. ते आंदोलनासाठी आपलं पाऊल टाकताना दिसत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण आपला उमेदवार दिला नाही. मात्र आता आपण विधानसभेसाठी आपला उमेदवार देणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. नारायण गड येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं नाव न घेता टीका केलीये.
राज्यात आपलं कोणीही विरोधक नाही केवळ एकच विरोधक आहे, असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचं नाव न घेता हल्ला केला. राज्यात येवल्या वाल्याला सोडलं तर मी कोणालाही विरोधक मानत नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला. आम्ही लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिला नाही. आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही. जे सगे सोयरे या विषयाच्या बाजूने आहे, त्याचा विचार करा. जे सगे सोयऱ्याच्या बाजूने नाही, त्यांना पाडा. त्यांचा पराभव असा करा की त्यांच्या दोन-तीन पिढ्या वर येऊ नये. त्यांना पाडण्यातच आपला विजय असल्याचं जरांगे पाटील म्हणालेत.
विधानसभेला मराठा मैदानात उतरणार
“मी कोणाला कॉल केला नाही. कोणाला मतदान करण्यासाठी सांगितलं नाही. मराठा समाजाने आता ते ठरवायचं आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत. आपण कधीच खोटं बोलत नाही. यंदा विधानसभेला मराठा मैदानात उतरणार आहे. काहीजण स्वार्थासाठी माझं नाव वापरून जातीचं राजकारण करत आहेत. माझं नाव वापरून कोणाला अर्थिक फायदा काय मिळेल हे माहिती नाही पण समाजाचे वाटोळं करू नका”, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
“ओबीसी बहुजन पार्टीचे सांगलीचे लोकसभेचे उमेदवार प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या गाडीवर चप्पलांचा हार घालण्यात आला होता. गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली होती. यावर मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. असं कृत्य कोणी करू नये. यामुळे मराठा समाजाला बदनाम केलं जात आहे. मराठा असो ओबीसी असं कोणीही करू नये. काहींनी ओबीसी मतं मिळवण्यासाठी हे स्टंट केले. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा विचार आहे,” असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत होते. ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. सगेसोयरे अंमलबजावणीसाठी सरकारकडे अनेक निवेदने देण्यात आली. सरकारला मराठा आरक्षणासाठी मागणी केली. सरकारने मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही.