राज्यघटना बदलणार हा निव्वळ कांगावा – बारणे
… तर जास्तीत जास्त विकास निधी मिळेल – प्रशांत ठाकूर
दि २७ एप्रिल (पीसीबी ) पनवेल – ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी) केले. राज्यघटना बदलणार हा विरोधकांचा निव्वळ कांगावा असल्याचा आरोपही बारणे यांनी केला.
पनवेलच्या ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात खैरणे येथे झालेल्या चौक सभेत खासदार बारणे बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, संतोष भोईर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुण भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे तसेच एकनाथ देशेकर, राजेंद्र गोंधळी, संभाजी जगताप, सरपंच शैलेश माळी आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले की, देश कोणाच्या हातात सोपवायचा, याचा निर्णय या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. देशाला सुरक्षित ठेवू शकेल, अशा भक्कम हातांमध्ये देश सोपवणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून विचारपूर्वक मतदान करावे.
देशात व राज्यात एका विचाराचे सरकार असेल तर विकास अधिक गतीने होतो. केंद्राप्रमाणे राज्यातही चांगले सरकार आहे. जनतेच्या संकटाला धावून जाणारे सरकार आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व आहे. कालबाह्य झालेले ब्रिटिश कायदे बदलून त्यात काळानुरूप बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे मोदी हे राज्यघटना बदलणार असल्याचा कांगावा ते करीत आहेत. आपल्या देशात कोणीही घटना बदलू शकत नाही, असेही बारणे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली आहे. जगभर भारताचा दबदबा निर्माण केला आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, असेही बारणे म्हणाले.
जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी…
पनवेल विधानसभा मतदारसंघाला शासनाचा जास्तीत जास्त निधी हवा असेल, तर खासदार बारणे यांनाही जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणे हे आपलं कर्तव्य आहे, असे आमदार ठाकूर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना पंतप्रधान मोदी व खासदार बारणे यांच्यामुळे पैसे परत मिळू शकले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
बाळासाहेब पाटील, रामदास शेवाळे, रामदास पाटील, प्रल्हाद केणी यांचीही यावेळी भाषणे झाली.
खैरणे येथील सभेनंतर बारणे यांनी नितळस, तोंडरे, पेंधर, नावडे आदी गावांना भेट देऊन मतदारांशी संपर्क साधला.