दि २७ एप्रिल (पीसीबी ) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून सुजय विखे आणि महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलीये. अशात आता महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नीलेश लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचा विखेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामागे खासदार विखे यांचे रडीचे राजकारण असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे.
शरदचंद्र पवार गटातून अधिकृत उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांना दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीये. मात्र सुजय विखे यांच्या पराभवाच्या भीतीने सुजय विखे यांनी डमी उमेदवार दिला असून रडीचा डाव खेळल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. विखे पाटलांची गेली 50 वर्षांची डमी उमेदवार उभा करण्याची परंपरा यावेळी देखील कायम राखली असल्याचा दावा राजेंद्र फाळके यांनी केला, ते नगर राष्ट्रवादी भवनातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पत्रकार परिषदेमधून विखेंवर फाळके यांनी हल्लाबोल केला. पुराव्यासह त्यांनी सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये विखेंची पोलखोल केली आहे. संपत्तीसाठी रक्तातील नाव भासवून भावाच्या ठिकाणी डमी व्यक्ती दिला होता. हेच काय तर आताच्या तलाठी भरतीमध्ये अनेक डमी उमेदवार पास झालेत असा दावा फाळके यांनी केला.
“विखे परिवार पुरता हादरला…”
आताच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना निलेश लंके हे जड जाताना दिसत आहेत. यामुळे आता विखे परिवार पुरता हादरून गेला आहे. विखे यांनी नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाचा साधर्म्य असणारा उमेदवार नीलेश साहेबराव लंके यांच्या नावाचा फॉर्म दाखल करण्यात आला. नीलेश साहेबराव लंके हे मूळचे कामोठा, रायगड जिल्ह्यातील आहे. मात्र सुधारीत यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे, असं राजेंद्र फाळके म्हणालेत.
राजेंद्र फाळके यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. सुजय विखे आणि नीलेश साहेबराव लंके यांच्या उमेदवारी अर्जाचे प्रतिज्ञापत्रक डी. पी. अकोलकर यांच्याकडून दोन्ही प्रतिज्ञापत्रक घेतलेत. हा निव्वळ एक योगायोग नसून विखेंनी नीलेश साहेबराव लंके यांना उमेदवारीसाठी डमी बसवला असल्याचा आमचा पुरावा असल्याचा दावा फाळके यांनी केलाय.
माझ्याकडे दोन सुजय विखे संपर्कात होते. दोन्ही विखे हे लोणीमधील होते. सुजय रमाकांत विखे आणि सुजय दिगंबर विखे यांनी डमी अर्ज भरण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र आम्ही डमी राजकारण केलं नाही. रडीचा डाव खेळला नाही. नीलेश लंके यांच्या डमी उमेदवारीवर बोलणार नाही पण सुजय विखेंच्या डमी राजकारणाची पोलखोल मतदारसंघात वारंवार करत राहू, इशारा राजेंद्र फाळके यांनी दिला.