चिंचवडमध्ये बारणे यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळेल – शंकर जगताप

0
156
  • विक्रमी मताधिक्यासाठी मतदानाचा टक्का वाढवा – खासदार बारणे

थेरगाव – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळेल. सुमारे पावणेदोन ते दोन लाख मतांच्या फरकाने ते विजयी होतील, असा विश्वास पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आज (शुक्रवारी) व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात झालेल्या नमो संवाद सभेत ते बोलत होते. त्यावेळी खासदार बारणे, भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, अभिषेक बारणे, हर्षल ढोरे‌ तसेच प्रसाद कस्पटे, पियुशा पाटील, नितीन बारणे, रवी भिलारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात घडवलेल्या अमूलाग्र बदलांमुळे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची तर बारणे यांची खासदारकीची हॅटट्रिक निश्चित आहे. भारतात 400 पेक्षा अधिक खासदार निवडून आणताना त्यात मावळातून बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मागच्या निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पारनेर यांना सर्वाधिक 96 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यात दुपटीने वाढ होऊन यावेळी पावणेदोन ते दोन लाखांपर्यंत मताधिक्य वाढेल.

प्रचंड उन्हामुळे मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याबद्दल खासदार बारणे यांनी चिंता व्यक्त केली. विदर्भामध्ये 42-43% मतदान झाले आहे. विक्रमी मताधिक्याच्या गोष्टी करताना मतदानाची टक्केवारी वाढेल, यासाठी कार्यकर्त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.