दि २६ एप्रिल (पीसीबी ) – पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गँगची दहशत दिसून येत आहे. पुणे शहर परिसरात अनेकदा कोयता गँगने गाड्या फोडल्याची भरदिवसा कोयत्याने वार करण्याची प्रकरणे ताजी असताना आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात कोयत्याने अनेक दुचाकी, रिक्षा यांचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यातील बिबवेवाडी सुपर परिसरात काल रात्री 11च्या सुमारास 10 ते 15 गुंडानी 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी आणि एका कारवर कोयत्याने वार करत वाहनांचे नुकसान करून, दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातात कोयते घेऊन काही मुलांनी गाड्यांची तोडफोड केली. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या भागातील महिला लहान लहान मुले आणि नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. वारंवार असे प्रकार घडत असून, पोलीस या गुंडांवर कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस कोयत्याची दहशत वाढत आहे. परंतु पुणे पोलिसांना कोयत्याची दहशत मोडीत काढण्यास अपयश येत आहे. अप्पर परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर परिसकात कोयता गँग दहशत पसरवताना दिसत आहे. कोयत्याने गाड्या फोडल्याचे अनेकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वारंवार असे प्रकार घडत असून, पोलीस या गुंडांवर कारवाई करत नसल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.