बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी मनसे पूर्ण ताकतीनिशी प्रचार करणार – नितीन सरदेसाई

0
158
  • खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा मनसेचा निर्धार

खोपोली, दि. 24 एप्रिल – महाराष्ट्र सैनिकांसाठी राज साहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. त्यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीनिशी प्रचारात उतरेल, अशी ग्वाही मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- मनसे- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक खोपोली येथील युके रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. बैठकीस खासदार बारणे, आमदार महेंद्र थोरवे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमित खोपकर, मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी रणजीत शिरोळे, जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, मनसेचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच विजय पाटील, योगेश चिले व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरदेसाई म्हणाले की, राज साहेबांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीचा प्रचार पूर्ण ताकतीनिशी करणार आहोत. निवडणूक झाल्यानंतर महायुतीच्या खासदारांनी पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून विकासाची कामे करावीत, एवढीच महाराष्ट्र सैनिकांची अपेक्षा आहे.

राज ठाकरे यांचा निर्णय दूरदृष्टीचा आहे, असे मत आमदार थोरवे यांनी व्यक्त केले. शिवसेना आणि मनसे यांची विचारधारा एकच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊनच दोन्ही पक्ष काम करीत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये काही मतभेद असले तरी मनभेद कधीच नव्हते, असेही ते म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले की, मी संघर्षातून पुढे आलो आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शासकीय योजना अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता आल्या. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, ही देशातील जनतेची भावना आहे. त्यामुळे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

निवडणुकीनंतरही समन्वयाच्या भूमिकेतून पुढील काम करू व मनसेला दिलेला शब्द पाळू, अशी ग्वाही देखील खासदार बारणे यांनी दिली.