धोकादायकपणे काढलेल्या गॅसची चढ्या दराने विक्री

0
122

सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. तसेच त्या गॅसची चढ्या दराने विक्री केली. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शिंदेवस्ती, मारुंजी येथे करण्यात आली.

गणेश रामचंद्र माने (वय 25, रा. मारुंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश माने याने घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून धोकादायकपणे लहान सिलेंडरमध्ये गॅस चोरून काढला. त्यानंतर लहान सिलेंडर चढ्या दराने विकले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत गणेश माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.