आरोपीला पकडणा-या दोन पोलिसांच्या हाताला चावा

0
313

वाकड पोलीस ठाण्यातील बीट मार्शलवर असलेले पोलीस एका व्यक्तीच्या मदतीसाठी गेले. तरुणाने एका व्यक्तीला चाकूने मारून जखमी केले होते. त्याला पकडत असताना त्या तरुणाने दोन पोलिसांच्या हाताला चावा घेऊन पोलिसांना देखील जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी सात वाजता धनगरबाबा मंदिराच्या मागे, थेरगाव येथे घडली.

सुरज चंद्रकांत कुऱ्हाडे (वय 22, रा. धनगरबाबा मंदिराच्या मागे, थेरगाव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मच्छिंद्र व्हरकटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार व्हरकटे आणि दिनकर पोंदकुले हे बीट मार्शलवर असताना त्यांना नियंत्रण कक्षातून धनगरबाबा मंदिराच्या मागे, थेरगाव येथे मदतीसाठी कॉल आला. त्यानुसार ते धनगरबाबा मंदिराच्या पाठीमागील बाजूला गेले. तिथे आरोपी सुरज याने विलास कांबळे या व्यक्तीला चाकूने मारून जखमी केले होते.

त्यामुळे पोलीस अंमलदार व्हरकटे यांनी सुरज याला पोलीस ठाण्यात चल, असे म्हटले. त्यानंतर सुरज तिथून पळून जाऊ लागला. त्यामुळे व्हरकटे यांनी सुरज याला पकडले. त्यावेळी त्याने पोलीस अंमलदार व्हरकटे यांच्या हाताला चावा घेतला. त्यांच्या मदतीसाठी आलेले काळेवाडी बीट मार्शलचे अंमलदार सत्यनारायण पिल्लामारी यांच्या देखील दंडाला आरोपीने चावा घेऊन जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.