खासदार श्रीरंग बारणे अब्जाधीश, 132 कोटींचा मालमत्ता

0
288

पिंपरी : महायुतीचे मावळचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे अब्जाधीश आहेत. १३२ कोटी २३ लाख ९१ हजार ६३१ रुपयांची त्यांची मालमत्ता असून, पाच वर्षांत २९ कोटी ४२ लाख ८१ हजार ४९७ रुपयांनी मालमत्तेत वाढ झाली आहे. निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीवेळी २०१९ ला उमेदवारी अर्ज दाखल करताना बारणे कुटुंबाने १०२ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांची मालमत्ता दाखविली होती. त्यात बारणे यांची ८३ कोटी १७ लाख ४६ हजार, तर पत्नी सरिता यांची १९ कोटी ६३ लाखांची मालमत्ता होती. आता २०२४ मध्ये बारणे कुटुंबीयांची एकूण संपत्ती १३२ कोटी २४ लाखांवर पोहोचली. त्यात बारणे यांची एकट्याची जंगम आणि स्थावर अशी १०६ कोटी ५५ लाखांची, तर पत्नी सरिता यांची २५ कोटी ६८ लाखांची मालमत्ता आहे. बारणे यांच्याकडे २६ लाख, तर पत्नीकडे १२ लाख रोख रक्कम आहे. शेती, बांधकाम व्यावसायिक आणि वीट कारखानदारी हे बारणे यांचे व्यवसाय आहेत. त्यांच्या विविध बँकांमध्ये मुदत, बचत ठेवी, शेअर्स, विमापत्रे, भागभांडवल आहेत. सहा जणांना त्यांनी कर्ज दिले आहे.

बारणे यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ आणि टोयाटो फॉर्च्युनर या दोन मोटारी आहेत. त्यांच्याकडे हिऱ्याची ११ लाख ५५ हजारांची एक अंगठी, तर ३२ लाख ५० हजारांचे ४७० ग्रॅम सोने आहे. ३५ हजारांचे एक वेब्ली अँड स्कॉट बनावटीचे रिव्हॉल्व्हरही आहे. तर पत्नी सरिता यांच्याकडे पाच लाख ५० हजारांच्या कर्णकुड्या, ५१ लाखांचे ७४३ ग्रॅम सोने आहे. बारणे यांच्यावर ४४ लाखांचे वाहन आणि वेगवेगवेळ्या संस्थांचे ४१ लाख असे एकूण ८५ लाखांचे कर्ज आहे.

खासदार बारणे यांची मावळ तालुक्यातील पाचाणे येथे तीन ठिकाणी, मुळशी तालुक्यातील मारुंजी, माणमध्ये शेतजमीन आहे. तर ताथवडे, चऱ्होलीसह, थेरगावामध्ये पाच ठिकाणी बिगरशेतजमीन असून, थेरगावमध्ये चार वाणिज्यिक, तीन निवासी इमारती आहेत.