दि २२ एप्रिल (पीसीबी ) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यातील सर्व समाजघटकांना, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी या जाहीरनाम्याचे कौतुक केले.
याचबरोबर ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित हा जाहिरनामा तयार करण्यात आलेला असून, राष्ट्रवादी काँग्रेसची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. त्यामध्ये सार्वजनिक सेवा, पायाभूत सुविधासह आर्थिक प्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आलेला आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी हा जाहीरनामा केलेला आहे. पक्षासाठी एक चांगला जाहीरनामा तयार केला त्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांना अजित पवार यांनी धन्यवाद दिले.
जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये –
या जाहीरनाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी पाठपुरावा करणार, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा, शेतकऱ्यांना एमएसपी मिळावी, अपारंपरिक वीजनिर्मिती, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाला थांबवायचे असेल तर अपारंपरिक वीजनिर्मितीला चालना, उद्योगांना प्राधान्य, कृषी पीकविम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, जातीनिहाय जनगणना, उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा, ही ठळक वैशिष्ट्ये अजित पवार यांनी या वेळी सांगितली.
याशिवाय आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्री सांगतानाच त्यानुसार आम्ही काम करणार आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, यावर्षी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत.
मोदींच्या नेतृत्वाखाली आपला मोठा विजय निश्चित आहे. त्यांना तिसर्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊन मतं मागत आहोत. एनडीएचा एक आत्मविश्वासू चेहरा म्हणून बरेचजण त्यांच्याकडे बघत आहेत असे सांगतानाच विरोधी पक्षात, असा एकही चेहरा बघायला मिळणार नाही जो मोदींसोबत स्पर्धा करू शकेल आणि त्यांच्यासमोर उभा राहू शकेल, असा जोरदार टोला अजित पवार यांनी लगावला.