कर्नाटक मध्ये नगरसेवकाच्या मुलीचा खून, लव्ह जिहाद चा संशय

0
246

कर्नाटकच्या हुबळीमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात खून झाल्यानंतर आता कर्नाटकमधील वातावरण तापले आहे. नेहाच्या महाविद्यालयातील विद्यार्थी, आरोपीचे वडील यांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून पुन्हा कुणीही महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही. तर कर्नाटकचे मजूर मंत्री संतोष लाड यांनी अशा गुन्ह्यातील आरोपींचा एन्काऊंटर करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने असे काही धोरण आखावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

आरोपी फयाजचे वडील बाबासाहेब सुबानी हे सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, निरंजन हिरेमठ यांनी त्यांची मुलगी नेहाला माझा मुलगा फयाज त्रास देत असल्याचे सांगितले होते. सुबानी पुढे म्हणाले, “गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता मला फयाजने केलेल्या कृत्याची माहिती मिळाली. हे ऐकून मला धक्काच बसला. फयाजला अशी शिक्षा मिळावी की, पुन्हा कधीही कुणी अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी धजावू नये. नेहा माझ्या मुलीसारखी होती. तिच्या कुटुंबाची मी माफी मागतो.”

सुबानी पुढे म्हणाले की, फयाजने सैन्यात जावे, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी त्याला व्यायामशाळेत जाण्यासाठी प्रेरीत केले होते. मागच्या सहा वर्षांपासून मी आणि पत्नी विभक्त झालो आहोत. फयाज त्याच्या आईबरोबर राहत होता. आम्ही तीन महिन्यांपूर्वी शेवटचे बोललो होतो. त्याला जेव्हा पैशांची गरज भासायची, तेव्हा तो मला फोन करायचा. माझ्या मुलाने गुन्हा केला, हे मी मान्य करतो. फयाज आणि नेहा यांचे प्रेमसंबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पण माझा याला नकार होता. मी हात जोडून तिचा नाद सोडावा, अशी त्याला विनंती केली होती.

नेहा हिरेमठचे वडील निरंजन हिरेमठ यांनी या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला. ते म्हणाले, आजचे युवक चुकीच्या रस्त्यावर कसे चालतात? याची आम्हाला कल्पना नाही. समाजात लव्ह जिहादचा वेगाने प्रसार होत आहे, असेही ते म्हणाले.

अशा गुन्हेगारांचा एन्काऊंटर करा
कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष लाड यांनी मात्र या घटनेचा निषेध व्यक्त केला असून या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे. पण सरकारने अशा गुन्हेगारांचा एन्काऊंटर करावा, असेही ते म्हणाले. हे कृत्य अमानवीय असून मुलीच्या पालकांना प्रचंड दुःख देणारे आहे. त्यामुळे मी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करतो की, त्यांनी असे प्रसंग भविष्यात पुन्हा घडणार नाहीत, यासाठी धोरण आखावे आणि अशा गुन्हेगारांचा एन्काऊंटर करावा