धैर्यशील मोहित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप

0
196

माढा लोकसभा मतदारसंघात नवीनच ट्विस्ट निर्माण झाला आहे. धैर्यशील मोहित पाटील यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी हरकत घेतली आहे. नोकरीचा तपशील धैर्यशील मोहित पाटील यांनी भरला नसल्याने रणजितसिंह निंबाळक यांची हरकत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे मोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले. शरद पवारांची भेट घेत त्यांच्या पक्षात प्रवेशदेखील केला. आपले राजकीय विरोधक उत्तम जानकर यांच्याशी हातमिळवणी करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली बाजू भक्कम बनवली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्जदेखील दाखल केला आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभय जगताप यांनी दंड थोपटले होते. ते उमेदवारी दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये होते. त्यांचे बंड शमविण्यात शरद पवार गटाला यश आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूने गोष्टी घडत असताना भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांनी घेतलेल्या आक्षेपाला ते कसे उत्तर देतात, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.