विदर्भातील पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. नागपुरात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना होत असला तरी भाजपचे मतदान केंद्र नियोजन मजबूत असल्याचे स्पष्ट झाले. गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्हा असला तरी त्याचा मतदानावर परिणाम झाला नाही. भंडारा-गोंदिया, रामटेक आणि चंद्रपूर येथे महायुती व महाविकास आघाडीत जोरदार लढत झाल्याने निकाल नक्की कुणाच्या बाजूने लागेल हे सांगता येणार नाही. दरम्यान, कमी टक्केवारीचा मोठा फटका भाजपलाच बसणार असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. विदर्भातील १० पैकी नितीन गडकरी यांची नागपूरची जागा वगळता अन्य ठिकाणी भाजपला किंमत मोजावी लागणार आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडाफोडीचा राग मतदार व्यक्त करत असल्याचे समजले.
महाराष्ट्रातील नागपुरातील लढतीकडे देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. सकाळीच पुरूष, पहिल्यांदा मतदान करणारे युवक बाहेर पडले. दुपारी महिला मतदानासाठी बाहेर पडल्या. रामटेकमध्ये शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस तळ ठोकून होते. खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कापत काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना पक्षात घेत शिवसेनेची उमेदवारी दिली.
पण, सक्षम उमेदवार न सापडल्याने बाहेरून उमेदवार आणला आणि उभा केला. त्यातही तुमानेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी होतीच. मतदारसंघात बौद्ध समाजाचे साडेसहा लाखांच्या आसपास मतदान आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेस यांच्यात लढत रंगल्याने नक्की कोण विजयी होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
शहरी भागात भाजप तर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मतदान झाले. त्यातच उमरेडमध्ये ६५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. एटापल्ली, अहेरी, कुरखेडा या भागात काँग्रेसकडे कल असल्याचे दिसून आले तर गडचिरोली, ब्रम्हपूर, चिमूरमध्ये भाजप चालला.
भंडारा-गोंदियात संथगतीने मतदान झाले. या मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचा उमेदवार रिंगणात असल्याने त्याचा फटका नक्की कुणाला बसेल, हे सांगता येणार नाही. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकाच जातीचे आहेत. या मतदारसंघातील एकूण कल पाहता भंडारा, मोहाडी, तुमसर आणि गोंदिया या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले तर लाखनी, लाखांदूर, तिरोडा, साकोली आणि भंडारा येथे भाजपने बूथवाईज नियोजन करीत मतदारांना बाहेर काढले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकच खासदार चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आला होता. यावेळेस भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरविले. पण, बल्लारपूर, राजुरा, वणी, वरोरा, चंद्रपूर मतदारसंघातील ग्रामीण भागात काँग्रेसला मतदान झाल्याचे चित्र आहे तर शहरात भाजप वरचढ दिसला. दरम्यान, २०१४ व २०१९ च्या तुलनेत यंदा मागासवर्गीय, मुस्लिम वस्त्या व झोपडपट्ट्यांमधील मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. एमआयएमने उमेदवार न दिल्याने मुस्लिमांची एकगठ्ठा मते पडली. अर्थात त्यांचा कल काँग्रेसकडे असल्याचे दिसून आले.