सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या उलाढाली होताना दिसत आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. वेळापूरमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण उत्तम जानकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून उत्तम जानकर कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याकडे सर्व राजकीय नेतेमंडळींचं लक्ष होत. मात्र आता हे चित्र स्पष्ट झालं आहे. वेळापूरमध्ये उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे कुटुंब तब्बल 30 वर्षांचे वैर संपवून एकत्र आल्याचे समोर आले आहे.
यावर उत्तम जानकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे की, मी सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहे. मात्र, बारामतीमध्ये अजित पवारांना पाडूनच मी पक्ष सोडणार आहे. त्यामुळे उत्तम जानकर आता मोहिते पाटील कुटुंबियांसोबत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. उत्तम जानकर यांच्या या निर्णयामुळे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
जानकर आणि मोहिते पाटील यांनी तब्बल 30 वर्षांचे वैर सोडून एकत्र येण्याचा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये एक समीकरण ठरलं आहे. तर खासदारकी मोहिते पाटील लढवणार तर आमदारकी उत्तम जानकर लढवणार अशी बोली त्यांच्यामध्ये झाली आहे.
गेली सहा महिन्यापासून धैर्यशील मोहिते पाटील व उत्तम जानकर कुटुंब एकत्र येणार हे ठरले होते. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 302 नुसार जुना गुन्हा दाखल करण्याच्या व उत्तम जानकर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या धमक्या वारंवार येत आहेत असा आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे. मात्र आता हे दोन्ही कुटूंब एकत्र येणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.