“क्रांतिवीर चापेकर बंधूंचे स्मरण आपल्या कृतीमधून व्हावे!” – आनंद रायचूर

0
184

“क्रांतिवीर चापेकर बंधूंचे स्मरण आपल्या कृतीमधून व्हावे!” असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्राचे अभ्यासक, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक आनंद रायचूर यांनी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी क्रांतिवीर चापेकर चौक, चिंचवडगाव येथे केले. क्रांतिवीर दामोदर हरि चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून प्रमुख वक्ते म्हणून आनंद रायचूर बोलत होते. यावेळी क्रांतिवीर चापेकरांचे वंशज राजीव चापेकर, अनुजा चापेकर, मंजिरी गोडसे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सदस्य अशोक पारखी, सुहास पोफळे, आसराम कसबे, मधुसूदन जाधव, लाठीकाठी आणि दांडपट्टा पथकाच्या प्रमुख मोनिका पेंढारकर, अतुल आडे असे मान्यवर तसेच समितीच्या शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

ढोल-ताशा, लेझीम पथक, क्रांतिवीरांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, क्रांतिवीरांचा जयघोष, शंभर टक्के मतदान जनजागृती करणारे फलक यांसह भव्य अभिवादन फेरी चिंचवड परिसरातून काढण्यात आली. चापेकर चौक येथिल क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनी ‘चापेकरांची शिकवण..’ हे गीत गाऊन अभिवादन केले. अभिवादन फेरीतील लाठी-काठी, दांडपट्टा पथकाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

क्रांतिवीर चापेकर वाडा येथे मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविक करताना क्रांतिवीर चापेकर समितीच्या स्थापनेचा इतिहास, हेतू स्पष्ट करत आज चापेकर वाड्याचे राष्ट्रीय संग्रहालयात होणारे रूपांतर याविषयीचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आनंद रायचूर यांनी क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रेरणा कशी घेतली, प्रयोगनिष्ठ विज्ञानवादी, बुद्धिवादी सावरकरांनी संविधानाच्या आधारे मनुष्यहितावह असलेल्या गोष्टींना प्राधान्य कसे दिले हे स्पष्ट केले. हिंदूंच्या अंतर्गत जातीय व्यवस्था पाकिस्तानच्या निर्मितीस कारणीभूत ठरली हे सांगताना ‘मनातला जातिभेद काढून टाका व समाजाची शक्ती एकजूट राहण्यासाठी प्रयत्न करा. जीव गेला तरी चालेल पण आपले राष्ट्रीयत्व सोडू नका.’ असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी ‘कंठस्नान व बलिदान’ या पुस्तकातील क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या फाशीच्या प्रसंगाचे प्रकट वाचन करून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, धैर्य, निडरता निर्माण केली.

क्रांतिकारकांचे पोवाडे, कवने फक्त अनुस्मरण करणार्‍यांनी नव्हे तर अनुकरण करणार्‍या शूर मर्दांनीच गावेत, असे आग्रहाने सांगताना चापेकर बंधूंचे कार्य, विचार हे तरुणांच्या कृतीमधून, आचरणातून प्रकट झाले पाहिजे आणि हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याची जबाबदारी आजच्या शिक्षकवर्गाची आहे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आनंद रायचूर यांचे राष्ट्रप्रेमाने भारावलेले शब्द, त्यांची मनात देशभक्तीची ज्वाला चेतवणारी देहबोली, आवाजातील जरब यामुळे श्रोतावर्ग भारावून गेला होता. कार्यक्रमाचे आभार समितीचे सदस्य आसराम कसबे यांनी मानले; तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे आचार्य सतीश अवचार यांनी केले. क्रांतिवीर चापेकर स्तवनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला